माजी आमदार अनिल गोटे हे स्वतःहून पोलिस ठाण्यात गेले.... पण? - Anil Gote reaches police station but police refused to attend him | Politics Marathi News - Sarkarnama

माजी आमदार अनिल गोटे हे स्वतःहून पोलिस ठाण्यात गेले.... पण?

भूषण अहिरे
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

पोलिस ठाण्याबाहेर गोटे आणि जयकुमार रावल यांचे समर्थक एकमेकांना भिडले... 

धुळे : माजी आमदार अनिल गोटे यांच्यावर दोंडाईचा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर गोटे स्वतःहून चौकशीसाठी आज ठाण्यात हजर झाले खरे पण पोलिसांनी त्यांना समन्स मिळाल्यानंतरच हजर राहावे, असे म्हणत पोलिस ठाण्यात येण्याचे कारण नसल्याचे सांगितले.

माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या फार्म हाऊसवर गेल्या आठवड्यात बेकायदा प्रवेश केला प्रकरणी गोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या आठवड्यापासून धुळे जिल्ह्यात हाय होल्टेज ड्रामा सुरू आहे. अनिल गोटे स्वतःहून दोंडाईचा पोलिस ठाण्यात गेले. पण पोलिसांच्या कठोर भूमिकेनंतर त्यांना तेथून बाहेर जावे लागले.

या वेळी बोलताना गोटे म्हणाले की मी रावल यांच्या फार्म हाऊसवर गेलो होतो. मात्र गोडीतून उतरलो देखील नाही. फार्म हाऊसच्या व्यवस्थापकाशी बोलून परतलो. याव्यतिरिक्त काहीही घडलेले नसतांना माझ्याविरूध्द रावल यांच्या सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.

गोटे यांच्यासोबत पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी होती. आमदार जयकुमार रावल व गोटे याच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अनिल गोटेंच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. यावेळी अनिल गोटेंच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला.

वाद नक्की काय होता?

आमदार जयकुमार रावल यांच्या टाकरखेडा येथील फार्म हाऊस वर अनिल गोटे आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर प्रवेश केल्या मुळे वॉचमन प्रतापसिंग गिरासे यांनी फिर्याद दिली आहे. यावर माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी स्पष्टीकरण देताना आमदार जयकुमार रावल यांनी  आमदार रावल यांच्या फार्महाऊसवर रात्री-अपरात्री महिलांच येणं जाणं सुरू असतंआणि या अनोळखी महिलांना भेटण्यासाठी आमदार जयकुमार रावल फार्म हाऊस वर रात्री-अपरात्री जातात. हे मला कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर याची पडताळणी करण्यासाठी मी रावल यांच्या फार्महाऊसवर गेलो होतो  व त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वाद झाला नसून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे स्पष्टीकरण गोटे यांनी दिले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख