Nashik Helmet Compulsion Drive initiated By Vishwas Nangre Patil | Sarkarnama

विश्‍वास नांगरे पाटील पाचशे पोलिसांच्या ताफ्यासह हेल्मेट सक्तीच्या मोहिमेवर 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 13 मे 2019

गेल्या काही वर्षात शहरात हेल्मेट सक्तीसाठी झालेले प्रयत्न राजकीय, सामाजिक संघटना, नेत्यांमुळे अयशस्वी झाले. या पार्श्‍वभूमीवर पक्का निर्धार करुन पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील आज सकाळपासून पाचशे पोलिसांच्या ताफ्यासह हेल्मेट सक्तीसाठी शहरातील रस्त्यांवर उतरले आहेत.

नाशिक  : गेल्या काही वर्षात शहरात हेल्मेट सक्तीसाठी झालेले प्रयत्न राजकीय, सामाजिक संघटना, नेत्यांमुळे अयशस्वी झाले. या पार्श्‍वभूमीवर पक्का निर्धार करुन पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील आज सकाळपासून पाचशे पोलिसांच्या ताफ्यासह हेल्मेट सक्तीसाठी शहरातील रस्त्यांवर उतरले आहेत.

बेदरकारपणे नाकाबंदीच्या ठिकाणीही पोलिसांना हुलकावणी देणाऱ्यांसाठी ३९ ठिकाणी 'झिकझॅक बॅरिकेडिंग नाकाबंदी' करीत तपासणी सुरु आहे. त्यात हेल्मेटधारकांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत तर हेल्मेट नसलेल्यांना दंड केला जात आहे. 

पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दोन आठवड्यांपूर्वीच शहरात पुन्हा हेल्मेटसक्तीची कारवाई आणखी काटेकोरपणे राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. यासंदर्भात सोशल मिडीयासह सर्वच माध्यमांतून आजच्या मोहिमेचा मोठा गाजावाजा करण्यात आला आहे. त्यासाठी स्वतः आयुक्त सकाळी विविध ठिकाणी जाऊन तपासणीचा आढावा घेत होता. यासंदर्भात मोठा फौजफाटाच रस्त्यावर उतरल्याने ही मोहिम चर्चेत आहे.

अनेक नागीरकांनी घरातुन बाहेर पडतानांच हेल्मेट घेऊन दुचाकी काढली. त्यामुळे शहरात काहीसे शिस्तीचे तर काहीसे दहशतीचेही वातावरण आहे. सोशल मिडीयावर याबाबत अनेक सुचनांसह हेल्मेटसक्तीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे ही मोहिम किती यशस्वी होते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. स्वतः आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील मैदानात उतरल्याने या मोहिमेची मात्र नागरीकांत चर्चा आहे. 

आजपासून हेल्मेटसक्ती व सीटबेल्टचा वापर न करणाऱ्यांना दंडात्मक कारवाईसह वाहने 'टोइंग'चीही कारवाई केली जाणार आहे. या कारवाईसाठी पोलिस आयुक्तालय हद्दीतील १३ पोलिस ठाण्यांचा एक पोलिस अधिकारी, ११ पोलिस कर्मचारी, चार महिला पोलिस कर्मचारी, वाहतूक शाखेचे पाच पोलिस कर्मचारी असा २० पोलिसांचा फौजफाटा असणार आहे. आयुक्तालय हद्दीत प्रत्येक पोलिस ठाणेनिहाय तीन ठिकाणी नाकांबदी केली जाणार आहे.

सकाळी नऊपासून हेल्मेटसक्‍तीच्या कारवाईची अंमलबजावणी सुरू होऊन, ही कारवाई दुपारी एकपर्यंत केली जाणार आहे. पोलिस ठाणेनिहाय ३९ नाकाबंदी ठिकाणे असतील. त्यासाठी १८ पोलिस अधिकारी, २८६ पोलिस कर्मचारी, १०४ महिला पोलिस कर्मचारी असे एकूण ३९० पोलिस हे पोलिस ठाण्यांचे असतील, तर वाहतूक शाखेचे १६५ वाहतूक पोलिस असा फौजफाटा रस्त्यावर आहे. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार खुष्कीच्या मार्गाच्या शोधात तपासणी टाळण्यासाठी आटापीटा करतांना दिसले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख