मालेगावच्या 'जाँबाज' शकीलने वाचवलेत 88 जणांचे प्राण!

महापालिका अग्निशमन दलातील शकील अहमद मोहंमद साबीर (शकील) याने दोन दिवसांपूर्वी देवळा येथे बस विहिरीत पडल्यावर एकट्याने सोळा मृतदेह बाहेर काढले. सतरा वर्षांच्या सेवेत त्याने आजवर पाण्यात पडलेले 530 हून अधिक मृतदेह काढले आहेत. यातील 88 जणांचे प्राण त्याने वाचवलेत
Nashik Fireman Shakeel have Saved Eighty Eight lives so far
Nashik Fireman Shakeel have Saved Eighty Eight lives so far

मालेगाव : महापालिका अग्निशमन दलातील शकील अहमद मोहंमद साबीर (शकील) याने दोन दिवसांपूर्वी देवळा येथे बस विहिरीत पडल्यावर एकट्याने सोळा मृतदेह बाहेर काढले. सतरा वर्षांच्या सेवेत त्याने आजवर पाण्यात पडलेले 530 हून अधिक मृतदेह काढले आहेत. यातील 88 जणांचे प्राण त्याने वाचवलेत. त्याच्या या कौशल्यामुळे त्याला 'तैराकी' म्हटले जाते. राज्यभरातून आमदार, नेते, मंत्री दुर्घटना झाल्यावर त्याला बोलावतात.

मेशी दुर्घटनेत 26 जणांना प्राण गमवावे लागले. 'एनडीआरएफ'च्या जवानांनी चार मृतदेह बाहेर काढले. याबाबत शकील म्हणाला, ''पावणेपाचच्या सुमारास माझ्यासह मालेगाव महापालिका अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोचले. साडेसहा ते पाऊणेसातच्या सुमारास बस बाहेर काढण्यात आली. जखमींना काढण्याचे काम सुरू होते. सव्वासातच्या सुमारास मी विहिरीत उतरलो. अॅपे रिक्षा शोधली. क्रेन व ऍपे रिक्षा काढल्यानंतर साडेसात ते पावणे अकरापर्यंत, तब्बल सव्वा तीन तास विहिरीत होतो. या कालावधीत सोळा मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. विहिरीत वाहनांचे ऑइल, डिझेल सांडलेले होते. ते नाकातोंडात जाण्याची भीती होती. माझा अनुभव पणाला लावत न थकता, न थांबता मी हे मृतदेह काढले.''

या वेळी एक वेगळीच शक्ती माझ्या अंगात संसारली होती. पावणेअकराच्या सुमारास आमदार डॉ. राहुल आहेर व सहकाऱ्यांनी 'तुम्ही थोडे चहा, पाणी, नाश्‍ता करून या' असे सांगितले. त्या वेळी बाहेर आलो. मृतदेह शोधल्यानंतर मी व माझे सहकारी भूषण ठाकरे, रवी शेजवळ यांच्याजवळ देत होतो. ते क्रेनच्या झुल्यावर मृतदेह ठेवत होते. मध्यरात्री एकला पुन्हा विहिरीत उतरलो. अडीचपर्यंत विहिरीतच होतो. एनडीआरएफच्या जवानांनी गळ लावून मृतदेह काढले. मी गळाचा वापर केला नाही. 17 वर्षांत प्रथमच अशा भयावह दुर्घटनेला सामोरे गेलो.''असेही तो म्हणाला.

''यापूर्वी मालेगाव तालुक्‍यातील अजंग येथील ट्रॅक्‍टर बंधाऱ्यात उलटून सात जण ठार झाले होते. त्या वेळी पाच मृतदेह काढले. 2016 मध्ये गिरणा धरणातून चार मृतदेह काढले होते. मेशीचा प्रसंग कायम स्मरणात राहील. माझ्या कामाचे आमदार डॉ. आहेर, पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्यासह साऱ्या उपस्थितांनी कौतुक केले. विहिरीतून बाहेर आल्यानंतर मी पूर्णपणे ऑइलने माखल्याने काळा झाला होतो. माझाच चेहरा मला ओळखू येत नव्हता. या कामातून मला मोठे समाधान मिळते. 'कुछ नेकी का काम कर रहे हैं' हीच बाब मनाला दिलासा देते. अग्निशमन अधीक्षक संजय पवार, महापालिका अधिकारी, कर्मचारी व मृताच्या नातेवाइकांनी दिलेली शाबासकीची थाप ही माझी मोठी देणगी आहे. सहकाऱ्यांच्या मदतीशिवाय हे शक्‍यच नाही,''असे तो सांगतो.

सगळीकडे 'शकील'चा डंका

शकील पोहण्यात तरबेज आहे. तो मृतदेह पाण्यातून काढण्याची अवघड जबाबदारी लीलया पार पाडतो. कोठेही दुर्घटना झाल्यास आमदार, नगरसेवक त्याला पाचारण करतात. धुळे, नाशिक, पुणे, संगमनेर, रत्नागिरी येथेही त्याने कामगिरी केली आहे. संगमनेर येथील धरणात तरुण बुडाला. दोन दिवस शोधूनही तो मिळाला नाही. तेव्हा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार आसिफ शेख यांच्या माध्यमातून शकीलला बोलावले. शकीलने संगमनेर येथे काही तासाच्या शोधमोहिमेनंतर हा मृतदेह पाण्याबाहेर काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com