भुकेल्या पोटांचा आधार बनली चांदवडची चौक मस्जिद! - Nashik District Chandwad Masjid Giving Food Grains to Poor | Politics Marathi News - Sarkarnama

भुकेल्या पोटांचा आधार बनली चांदवडची चौक मस्जिद!

हर्षल गांगुर्डे 
सोमवार, 30 मार्च 2020

लोकांवर उपासमारीची वेळ नको म्हणून चांदवडच्या चौक मशीद ट्रस्ट ने देणगी उभी करत, इंसानियत जिंदा है. चे संकेत दिले. या मशिदीशी संबंधित तरुणांनी कष्टकरी वर्गाला पंधरा दिवस पुरेल इतका किराणा द्यायला सुरुवात केली आहे

चांदवड : हातावरील पोट, दिवसभर राबायचं तेव्हा रात्रीची चूल पेटते असं कष्टप्राय जीवन जगणारा वर्ग घरात आहे तो किराणा पुरावा म्हणून संचारबंदीत एकाच वेळी जेवतांना दिसत आहे. यावर सरकारच्या 'गरीब कल्याण पॅकेज' ची मात्रा कधी अन् कसं काम करेल हे वेळ ठरवेल. पण सध्यातरी अशा कष्टकरी मंडळींचा आधार चांदवड येथील चौक मस्जिद बनली आहे.

संचारबंदी झाल्यापासून रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेकांचं जीवन होतं त्यापेक्षा अधिक कष्टप्राय झालं. झोपडी, रस्त्यालगतचा पाल, शहराच्या आधाराने चार पत्र्याचं घर त्यात ऊन, वारा, पावसाशी दोन हात करताना मिळेल ते काम करून सायंकाळची चूल पेटवणारा हा वर्ग संचारबंदी काळात रोजगराला मूकलाय. 'कमवू तेव्हा खाऊ' हीच जगण्याची रीत असलेला हा वर्ग कमालीचा हताश झाला. घरात आहे त्या मीठ मिरचीची बचत म्हणून ह्या वर्गावर चक्क एकाच वेळी जेवणाची वेळ आलीये.

एरवी उच्च, मध्यम वर्गांना न जमणारी जड कामं ह्या वर्गाच्या कौशल्याने कायम हलकी झालीयेत. आता मात्र जगणं जड झालेल्या या वर्गासाठी अगदी काही लोकच पुढे येत आहे. यात पुढाकार घेतलाय चांदवडच्या चौक मशिदीने! लोकांवर उपासमारीची वेळ नको म्हणून चांदवडच्या चौक मशीद ट्रस्ट ने देणगी उभी करत, "इंसानियत जिंदा है.." चे संकेत दिले!

याच प्रेरणेतून मग दानिश शेख, अझीम खान, वसीम तांबोळी, तंझीम शहा, तौसिफ शेख, शहानवाज शहा या तरुणांनी पंधरा दिवस पुरेल इतका किराणा पॅक करून तो अशा हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी वर्गापर्यंत पोहचवला. यावेळी काही लोक घरात एकाच वेळी जेवत असल्याचं भयाण वास्तव समोर आल्याचं त्यांनी सांगितलं.

दोन दिवसांत त्यांनी अनेकांच्या पोटाची भूक भागवली असून याकामी त्यांना नगरसेवक अल्ताफ तांबोळी, फिरोज पठाण, जाकीर शहा, जाहिद घासी आदी बांधवांचे विशेष सहकार्य लाभत आहे. विशेष म्हणजे किराणा माल वाटप करताना घेणारे हात खजील होऊ नयेत म्हणून याबाबतचे फोटोसेशन टाळत या तरुणांनी कमालीची संवेदनशीलता जपली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख