यात्रेतील 'शेव-रेवड्या'च्या धर्मा शिंदेला महाराष्ट्र केसरीचे कांस्यपदक! - Nashik Dharma Shinde Won Bronze medal in Wrestling | Politics Marathi News - Sarkarnama

यात्रेतील 'शेव-रेवड्या'च्या धर्मा शिंदेला महाराष्ट्र केसरीचे कांस्यपदक!

हर्षल गांगुर्डे 
रविवार, 12 जानेवारी 2020

आई सुनीता व वडील मधुकर शिंदे यांचा धर्मा मुलगा. शेजारी असलेलं शिंगवे हे मामाचं गाव. बाबा मार्कड तालुक्‍यातील नावाजलेले पहिलवान असल्याने कुस्तीची ओळख वारसाने आलीच. यात मामा भाऊसाहेब मार्कड यांनीदेखील कुस्तीचे धडे द्यायला सुरवात केली. मूठभर मिळालेल्या शेव-रेवड्या गरिबीचे चटके सोसणाऱ्या धर्माचं पहिल्या कुस्तीचं बक्षीस!

नाशिक : दुष्काळी चांदवड तालुक्‍यातील सुतारखेडे गावी जन्म... घरी दोन एकर कोरडवाहू शेती अर्थातच गरिबीचे चटके नित्याचेच. अशात बाबांकडून मिळालेला कुस्तीचा वारसा अन्‌ मामाने दिलेल्या भक्कम साथीने धर्मा शिंदे या पठ्ठ्याने गरिबीला धोबीपछाड देत नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातली. त्याच्या या यशाने दुष्काळी चांदवडचे नाव राज्यातील सर्वच आखाड्यांत गाजले. शिवाय महाराष्ट्र केसरीसाठी चांदवडकरांच्या आशादेखील उंचाविल्या आहेत.

आई सुनीता व वडील मधुकर शिंदे यांचा धर्मा मुलगा. शेजारी असलेलं शिंगवे हे मामाचं गाव. बाबा मार्कड तालुक्‍यातील नावाजलेले पहिलवान असल्याने कुस्तीची ओळख वारसाने आलीच. यात मामा भाऊसाहेब मार्कड यांनीदेखील कुस्तीचे धडे द्यायला सुरवात केली. मूठभर मिळालेल्या शेव-रेवड्या गरिबीचे चटके सोसणाऱ्या धर्माचं पहिल्या कुस्तीचं बक्षीस! या छोट्याशा बक्षिसाने गरिबीला धोबीपछाड देण्याचा आत्मविश्‍वास मिळालाच शिवाय कुस्तीविषयी देखील आवड निर्माण झाल्याने धर्माने नाशिकचं भगूर गाठलं. येथे वस्ताद गोरखनाथ व विशाल बलकवडे यांच्या तालमीत कुस्तीचे धडे गिरवताना शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत अनेकदा रौप्यपदक पटकावले. शिवाय गावागावात यात्रेनिमित्त भरणाऱ्या अनेक मानाच्या कुस्त्यादेखील त्याने मारल्या. 

विशीच्या आतला हा पहिलवान दुसरीकडे कुटुंबीयांनादेखील आर्थिक हातभार लावत असे. अशातच एका कुस्तीत मोठी दुखापत झाल्याने धर्मा थोडासा थबकला; पण थांबेल तो पहिलवान कसला? यातून लगेचच सावरत त्याने चांदवड येथील उषाराजे होळकर महाविद्यालयाकडून राज्यस्तरावर कांस्यपदक पटकावले. दरम्यानच्या काळात सध्याचा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व धर्मा दोघांनी सोबत पुणे येथील आंतराष्ट्रीय क्रीडासंकुल गाठले. अर्जुन पुरस्कारविजेते काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसरात्र मेहनत घेतली. 

धर्माने उत्तर महाराष्ट्र केसरी किताब सलग दोन वेळेस पटकावला. त्यानंतर पुणे विद्यापीठाकडून खेळताना रौप्यपदक, महाराष्ट्र युवा केसरी (८६ किलो) गटात सुवर्णपदक आणि आता ७९ किलो वजनी गटात माती प्रकारात महाराष्ट्र केसरी कांस्यपदकास धर्माने बाजी मारली. त्याच्या यशाने चांदवडसोबतच नाशिकच्या देखील शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. या सर्व यशाचे श्रेय तो सर्व वस्तादांना शिवाय संकटांच्या काळात पाठी भक्कमपणे उभे राहणारे सहाय्यक फौजदार भाऊसाहेब मार्कड (मामा) यांना देतो.

धर्मा शिंदेने आमच्या गावाचेच नव्हे तर तालुक्‍याचे व जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. त्याची मेहनत व चिकाटीने आगामी काळात नाशिकला चांदवडच्या मातीतून महाराष्ट्र केसरीचा मान पुन्हा मिळेल, अशी आशा वाटते - वाल्मीक वानखेडे, सुतारखेडे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख