विश्‍वास नांगरे पाटलांनी दिला इशारा, पोलिसांना कठोर होण्याची वेळ आणू नका

पोलिस देखील एक माणूस आहे. त्यांचे मनोबलही टिकून राहणे गरजेचे आहे. येत्या 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी आहे. त्याला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला तर 'कोरोना'वर मात करणे शक्‍य होईल. त्यासाठी सगळ्यांनीच जबाबदारीने वागावे अशी अपेक्षा नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केली
Vishwas Nangre Patil Appeals people to stay at home
Vishwas Nangre Patil Appeals people to stay at home

नाशिक : पोलिस देखील एक माणूस आहे. त्यांचे मनोबलही टिकून राहणे गरजेचे आहे. येत्या 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी आहे. त्याला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला तर 'कोरोना'वर मात करणे शक्‍य होईल. त्यासाठी सगळ्यांनीच जबाबदारीने वागावे. मग पोलिसांना आणखी कठोर अंमलबजावणीची वेळ येणार नाही,'' अशी अपेक्षा पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे- पाटील यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, ''सद्रक्षणाय खलनिग्रहणाय...हे पोलिसांचे ब्रीद आहे. त्यांच्यावर संपूर्ण समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. केवळ गुन्हेगारांपासून नव्हे तर समाजावरील आपत्तीपासून देखील. "कोरोना' हे तसेच संकट आहे. त्यापासून संरक्षणासाठी खाकी वर्दीतला माणूस रस्त्यावर उतरला आहे. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. हे मानव जातीवरील संकट आहे. ते सबंध देशावर आलेले नाही तर सारे जग त्याविरुद्ध लढा देत आहे. त्यावर मात करण्यासाठी सामुहिक जवाबदारीने सामोरे जाण्याची ही वेळ आहे. संचारबंदी, जमावबंदी लागू असल्यानंतरही काही लोक विनाकारण बाहेर पडतात. अत्यावश्‍यक सेवा वगळता कोणीही बाहेर येऊ नये अशी अपेक्षा आहे,''

"कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखता यावा, या उद्देशाने देशात संचारबंदी, जमावबंदी आदेश लागू आहे. यात नागरिकांनी स्वतःच होम क्वारंटाईन करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रसार होण्यापासून समाजाचा बचाव होऊ शकेल. त्यासाठी शहरभर नाकाबंदी आहे, आयुक्तालयाच्या हद्दीत 65 पोलीस चौक्‍यांच्या ठिकाणी लाऊड स्पीकर लावले आहेत. त्यांचा वापर सूचना देण्यासाठी केला जातो. गर्दीच्या वसाहतीमध्ये लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो. सुरुवातीचे काही दिवस वगळता नागरिकांनाही आता या संकटाची तीव्रता लक्षात आली आहे. त्याचा सकारात्मक परिणामही दिसत आहे. नियंत्रण कक्षाकडे तशी माहिती येत आहे,'' असेही नांगरे पाटील म्हणाले.

''शहरातील परिस्थिती पाहता पोलिसांना खूप कमी कारवाई करावी लागते आहे. आत्तापर्यंत 2 हजार 336 जणांना पासेस दिले आहेत. जुने नाशिक, मुंबई नाका या गर्दीच्या ठिकाणी स्वतंत्ररित्या सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांची नियुक्ती केली आहे. विनाकारण घराबाहेर पडनारे, वाहनचालकांवर संचारबंदी उल्लंघनाचे गुन्हे दाखल केले आहेत. सुमारे पावणे दोनशे वाहने जप्त केली आहेत. अगदी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांवर देखील कारवाई केली आहे. उद्याने, सार्वजनिक बाकांवर बसता येऊ नये यासाठी त्यार ऑईल, डांबर टाकले आहे,'' अशी माहिती त्यांनी दिली.

पोलिसांबाबत बोलताना ते म्हणाले, "पोलिसही एक माणूस आहे, त्यांचेही कुटुंब आहे, ते देखील नाकाबंदीतूनच घरी जातात. त्यामुळे त्यांच्याही संरक्षणाची जबाबदारी महत्वाची आहे. त्यांचे मनोबल टीकून राहणे गरजेचे आहे. वेल्फेअरच्या माध्यमातून प्रत्येक पोलीसाला सॅनिटायझर, मास्क दिले आहेत. मुख्यालयात स्वच्छता, निर्जंतुक औषधाची फवारणी केली आहे. कुटुंबीयांकडे व्हिटॅमिन सी व होमियोपॅथीच्या गोळ्या दिल्या आहेत,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com