Nashik Corporation Water Project Opening Issue | Sarkarnama

महापालिकेने उद्‌घाटन टाळून पाणी सुरु केल्याने भाजप नेते नाराज? 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 15 मे 2019

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि शहरातील पाण्याची टंचाई दोन्हीही हातात हात घालुन पावले टाकत आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाला उद्‌घाटनाची प्रतिक्षा केल्यास नागरीकांची अडचण होईल, हे लक्षात आल्यावर प्रशासनाने उद्‌घाटनाचा राजकीय सोपास्कार टाळून विल्होळी शुध्दीकरण केंद्र सुरु केला. त्यामुळे सिडकोचा प्रश्‍न मिटला. मात्र उद्‌घाटनाची संधी गेल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नेते मात्र कमालीचे नाराज झाल्याचे कळते. 

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि शहरातील पाण्याची टंचाई दोन्हीही हातात हात घालुन पावले टाकत आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाला उद्‌घाटनाची प्रतिक्षा केल्यास नागरीकांची अडचण होईल, हे लक्षात आल्यावर प्रशासनाने उद्‌घाटनाचा राजकीय सोपास्कार टाळून विल्होळी शुध्दीकरण केंद्र सुरु केला. त्यामुळे सिडकोचा प्रश्‍न मिटला. मात्र उद्‌घाटनाची संधी गेल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नेते मात्र कमालीचे नाराज झाल्याचे कळते. 

शहरातील शिवाजी नगर जलशुध्दीकरण केंद्रांतून सातपूर विभागात अतिरिक्त पाणी सोडले जात आहे. त्यामुळे सिडको विभागात पाणी पुरवठ्यावर ताण येतो. यातून मार्ग काढण्यासाठी अखेरीस ठेवणीतले म्हणजेचं मुकणे धरणातील आरक्षित पाणी शहरासाठी वापरण्यास सुरुवात झाली आहे. सध्या दररोज 50 दशलक्ष लिटर्स पाणी शहरासाठी वापरले जात आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता सन 2007 मध्ये जवाहरलाल नेहरु नागरी पुर्ननिर्माण योजनेंतर्गत मुकणे धरणातून थेट पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुकणे धरणातून 18 किलोमीटरची पाईपलाईन पाथर्डी पर्यंत टाकण्यात आली आहे. पाथर्डी फाटा येथे 400 दशलक्ष लिटर्स क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. 260 कोटींचा हा प्रकल्प मार्चमध्ये पुर्णत्वास आला. पाण्याची चाचणी घेण्यात आली. पण आचारसंहितेमुळे उदघाटन झाले नाही. 

जिल्ह्यातील काही तालुक्‍यांमध्ये दुष्काळ असल्याने नाशिकला स्थलांतर होत आहे. ही संख्या रोजच वाढते आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली. त्याचा सिडको परिसरावर परिणाम झाला. हे लक्षात घेऊन महापालिकेने आता उद्‌घाटनाची प्रतिक्षा न करताच प्रकल्प कार्यन्वीत केला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची उद्‌घाटनाची संधी हुकली. या प्रकल्पाचे नामकरण (कै) अटल बिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अन्‌ स्थानिक नाव यापैकी काय करावे यावरुन आधीच शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांत वाद रंगला होता. त्याचे पडसाद उद्‌घाटनाला शिवसेनेच्या नेत्याला बोलवावे की भाजपच्या मुख्यमं÷यांना यावरुन वाद वाढण्याची चिन्हे होती. ते आता टळले आहे. मात्र आचारसंहिता संपल्यावर उद्‌घाटनाचा घाट पुन्हा घालण्याचे मनसुबे राजकीय नेते करीत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख