ये मालेगाव है, 'ना कोई आ सकता है, ना बाहर जा सकता है' - डाॅ. पंकज आशिया यांनी दिले आदेश - Nashik Corona News Dr. Pankaj Asia Took Charge of Malegaon Emergencty Situation | Politics Marathi News - Sarkarnama

ये मालेगाव है, 'ना कोई आ सकता है, ना बाहर जा सकता है' - डाॅ. पंकज आशिया यांनी दिले आदेश

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 एप्रिल 2020

बेशिस्त, असहकाराने मालेगावकी स्थिती हाताबाहेर जाते की काय? असे वाटताच येथे डाॅ पंकज आशिया यांच्याकडे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कार्यभार दिला. त्यांनी लगेचच संचारबंदीत ना शहरात कोणी येईल, ना शहरातील कोणी घराबाहेर गल्लीत दिसेल अशा कडक सूचना दिल्या

मालेगाव : बेशिस्त, असहकाराने मालेगावकी स्थिती हाताबाहेर जाते की काय? असे वाटताच येथे डाॅ पंकज आशिया यांच्याकडे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कार्यभार दिला. त्यांनी लगेचच संचारबंदीत ना शहरात कोणी येईल, ना शहरातील कोणी घराबाहेर गल्लीत दिसेल.... रुग्णांच्या नातेवाईकांच्या स्क्रीनींगसाठी थेट पोलिस वापरा..... या सूचना दिल्याने बेशिस्त नागरीक धास्तावले, कर्मचारी सुखावले.

''शहरात २७ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरवासियांनी घाबरुन जाण्याचे कुठलेही कारण नाही. येथे आरोग्य क्षेत्रात मनुष्यबळ, रुग्णालय व साधनसामुग्रीची कमतरता निदर्शनास आली आहे. सोमवारपासून खासगी डॉक्टर, परिचारीकांची सेवा घेण्यात येईल. या संदर्भातील आदेश रात्रीच काढण्यात येतील. युनानी डॉक्टरांची सेवाही घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. विविध खासगी रुग्णालय, शाळा ताब्यात घेण्यासंदर्भात आजच्या आढावा बैठकीत चर्चा झाली. येत्या काही दिवसात त्याचे परिणाम दिसतील. सर्वांच्या सहकार्याने कोरोना संसर्गावर मात करु या.'' असे मालेगाव इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे नियंत्रण अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले.

शहरातील काही शाळाही ताब्यात घेणार

डॉ. आशिया म्हणाले, ''येथील सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय व कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करु. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्‍यक असणाऱ्या साधन सामुग्रीची यादी देण्या संदर्भात सूचना केल्या आहेत. पीपीई कीट, मास्क उद्या उपलब्ध होतील. जीवन हाॅस्पीटल अधिग्रहीत करण्यात आले आहे. त्याशिवाय युनानी वैद्यकीय महाविद्यालय व महिला व बाल रूग्णालय उपयोगात आणण्याचे नियोजन सुरु आहे. याशिवाय शहरातील काही शाळा ताब्यात घेण्यात येणार आहेत.''

खासगी रुग्णालये ताब्यात घेणार

ते पुढे म्हणाले, ''मालेगाव हायस्कूल मधील काही वर्ग खोल्या आज क्वारंटाइन असलेल्यांना हलविण्यात आले आहे. खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांचे कुटुंबिय व संपर्कात आलेल्यांना शोधण्यासाठी आज काही अडचणी आल्या. कमालपुरा भागात जमावाने विरोध केला. उद्यापासून या पथकासमवेत पोलिसही असतील. बैठकीत तशा सूचना देण्यात आल्या आहेत,''

''आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार तातडीने कोरोना बाधित, क्वारंटाइन, संपर्कात आलेल्या व संशयित तसेच भविष्यातील स्थिती लक्षात घेऊन बाराशे खाटांचे नियोजन सुरु आहे. जीवन हाॅस्पीटलला ५०, युनानी वैद्यकीय महाविद्यालयात ७० खाटांची सोय होऊ शकते. दरम्यान सामान्य रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३५ आहे," असे डॉ. हितेश महाले यांनी या वेळी सांगितले. 

बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, अपर पोलिस अधिक्षक संदीप घुगे, उपअधिक्षक रत्नाकर नवले, डॉ. किशोर डांगे, उपायुक्त नितीन कापडणीस, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, डॉ. भीमराव त्रिभुवन, जागतिक आरोग्य संघटनेचे अजहर शेख आदींसह नियंत्रण समितीतील अधिकारी उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी या कामी केलेल्या उपाययोजना व अडीअडचणी डॉ. आशिया यांच्यासमोर मांडल्या.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख