Nashik Bohada Festival | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सिध्दार्थ वनारसेंनी बोहाड्यात साकारले श्रीकृष्णाचे सोंग 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नाशिक जिह्यातील गोदाकाठी वसलेल्या चांदोरी गावात 21 जुलैपासून तेरा दिवसांच्या बोहाडा उत्सवास सुरवात झाली. सुमारे चारशे वर्षांची परंपरा व संस्कृतीचे प्रतीक म्हणून हा उत्सव ओळखला जातो.

नाशिक : चांदोरी (निफाड) येथील चारशे वर्षांची परंपरा असलेल्या बोहाड्याची राज्यभर ख्याती आहे. अनेक राजकीय नेतेही त्यात सोंगे साकारतात. निफाडचे जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सिध्दार्थ वनारसे यांनी मंगळवारी महाभारतातील सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्णाचे सोंग साकारले. त्यांचे हे नाट्य बघण्यासाठी सबंध तालुक्‍यातील नागरीक दाखल झाले होते. 

नाशिक जिह्यातील गोदाकाठी वसलेल्या चांदोरी गावात 21 जुलैपासून तेरा दिवसांच्या बोहाडा उत्सवास सुरवात झाली. सुमारे चारशे वर्षांची परंपरा व संस्कृतीचे प्रतीक म्हणून हा उत्सव ओळखला जातो. गणपती, सरस्वती, मच्छ-राक्षस, मारुती-जंबुमाळी, त्रिपुरासुर-शंकर, त्राटिका-राम लक्ष्मण, खंडेराव-दैत्य, वेताळ-विक्रमराजा, एकादशीदेवी-राक्षस, भस्मासुर-मोहिनी, इंद्रजीत-लक्ष्मण, रक्तादेवी-राक्षस, गजासुर-शंकर, भीमा-जरासंध, रावण-राम लक्ष्मण, वीरभद्र-दक्षप्रजापती, नरसिंह-हिरण्यकश्‍यपू अशा सोंगांची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर जगदंबा व महिषासुराच्या युद्धात त्याचा वध करून विजयी जगदंबादेवीची मिरवणुकीने यात्रेची सांगता होते. 

अंगाला झोंबणारा गार वारा, गडद अंधारातही चैतन्यदायी प्रकाश देणारे टेंभे, संबळ, पिपाणी आणि डफ अशा पारंपरिक कर्णमधूर वाद्यांच्या तालावर लयबद्ध पदन्यास करणारे सोंगे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. अनेक राजकीय नेतेही त्यात उत्साहाने सहभागी होत विविध सोंगे वठवतात. यंदा महाभारताचा अंक सादर करतांना त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सिध्दार्थ वनारसे यांचे सोंगाला ग्रामस्थांच्या चांगल्याच टाळ्या मिळविल्या. तालुक्‍यातील सर्वच राजकीय मंडळी यावेळी उपस्थित होती. 

येथे क्लिक करा आणि डाऊनलोड करा सरकारनामा अॅप

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख