Nashik Administration Keeping tab on People coming from Pune Mumbai | Sarkarnama

#CoronaEffect मुंबई, पुण्याहून आलेल्यांवर नाशिक प्रशासनाचे बारीक लक्ष

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोनाग्रस्त देशातून नाशिक मध्ये दाखल झालेल्या 303 नागरिकांवर महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून नजर ठेवली जात आहे. त्यापाठोपाठ आता मुंबई, पुण्यातून दाखल झालेले नागरीक सर्रास शहराच्या विविध भागात फिरताना दिसतात. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्यावर नजर ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत

नाशिक : कोरोनाग्रस्त देशातून नाशिक मध्ये दाखल झालेल्या 303 नागरिकांवर महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून नजर ठेवली जात आहे. त्यापाठोपाठ आता मुंबई, पुण्यातून दाखल झालेले नागरीक सर्रास शहराच्या विविध भागात फिरताना दिसतात. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्यावर नजर ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

नाशिक मध्ये स्थलांतरीत झालेल्या नागरिकांना होम कोरोंटाईन राहण्याचे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे. विशेष म्हणजे अशा नागरिकांवर पाळत ठेवण्याच्या सुचना आरोग्य पथकाला दिल्या आहेत. सोमवारपासून राज्यात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. बुधवार पासून देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. राज्यात संचार बंदी लागु केल्यानंतर मुंबई व पुण्यातून नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. 

कोरोनाग्रस्त दुबई, इंग्लंड, जर्मनी, ईटली, इराण, चीन या देशांमधून लोक नाशिकला आल्यानंतर त्यांना होम कोरोंटाईन करण्यात आले. त्यांच्या हातावर रबरी शिक्के देखील मारण्यात आले. परंतु, मुंबई व पुण्याहून नाशिकमध्ये आलेले नागरीक होम क्वारंटाईन न होता सर्रास सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने ही बाब गंभीर्याने घेतली आहे. आता अशा लोकांवर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांच्या घरी भेटी देवून त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात असतानाच मुंबई व पुण्यातून शहरात दाखल झालेल्या नागरिकांवर देखील लक्ष ठेवले जात आहे.

पालिकेकडून सर्वेक्षण सुरु

नाशिक शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला तरी महापालिका आपत्ती आल्यास तोंड देण्याची तयारी केली आहे. महापालिका आयुक्त गमे यांनी कोरोनाग्रस्त देशातून आलेल्या नागरिकांबरोबरचं मुंबई व पुणे येथून आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला असून नातेवाईकांवर ती जबाबदारी सोपविली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून सध्या सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. नाशिक महापालिका हद्दी मध्ये कोरोनाबाधित एकही रुग्ण आढळला नसला तरी काळजी म्हणून नाशिक महापालिकेने देखील मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख