माझा डावा कानच आता निकामी झालाय.....झीरवाळांच्या टोल्यामुळे सभागृह हास्यात बुडाले

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार नरहरी झीरवाळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यावेळी स्वागताच्या भाषणांनंतर झीरवाळ यांनी जे भाषण केले त्यामुळे अवघे सभागृह आणि प्रेक्षागृह अखंड हस्यात बुडून गेले होते
Narhair Zirwal indirectly Taunts Devendra Fadanaivs
Narhair Zirwal indirectly Taunts Devendra Fadanaivs

मुंबई : सभागृहात पहिल्या तासापासून धीर गंभीर असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार, अधिवेशनात विरोधकांच्या चाली हाणून पाडण्याच्या बेतातले जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि करड्या शिस्तीतले विधानसभा अध्यक्ष नाना पटोले अधिवेशनाच्या शेवटच्या तासात मात्र खळखळून हसले! जयंत पाटलांना तर हसण्याच्या ओघात नीट बोलताही आले नाही. याला कारण होते विधानसभेचे नवे उपाध्यक्ष नरहरी झीरवाळ यांचे भाषण!

अजितदादा, पाटील आणि पटोलेच नव्हे तर अवघे सभागृह या भाषणातला खोचकपणा समजून घेत हसत होते. खचाखच भरलेल्या विधीमंडळातील साऱ्याच प्रेक्षागृहातही अर्धा तास हास्याचे फवारे उडत राहिले होते. याला कारण होती दिंडोरीचे आमदार आणि विधानसभेचे नवे उपाध्यक्ष नरहरी झीरवाळ यांच्या धडाकेबाज भाषणातील 'डावा कान आणि डाव्या बाजुचे फडणवीस' ही सूचीत करणारी

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार झीरवाळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. ही निवड होण्यापूर्वी झीरवाळ हे सभागृहातील सहाव्या रांगेतील आपल्या खुर्चीत बसून होते. अध्यक्ष पटोलेंनी झीरवाळांची बिनविरोध निवड जाहीर केली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झीरवाळांच्या आसनापर्यंत गेले. तेव्हा त्यांचा हात धरूनच उपाध्यक्षांच्या जागेत म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या शेजारी झिरवाळांना बसविले.

त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे, अजितदादा,फडणवीस यांनी मनोगतातून झीरवाळांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यात लपलेल्या गुण वैशिष्ट्यांचे कौतुक केले. सामाजिक, राजकीय प्रवास सांगताना वैयक्तिक आयुष्यातील त्यांच्या आवडी-निवडी सांगत अजितदादांनी झीरवाळांची वेगळीच ओळख सभागृहात करून दिली. त्यानंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी झीरवाळांबाबतचे किस्से सांगून कार्यक्रमात रंगत आणली. 'झीरवाळ हे साधे आहेत, ते आम्हाला न्याय देतील,' अशी अपेक्षा फडणवीस यांनी बोलून दाखविली.

या साऱ्यांच्या शुभेच्छांवर झीरवाळ बोलू लागले. सामाजिक, राजकीय जीवनापुरतेच नाही तर गावात साडी नेसून तमाशा करणाराही मीच आहे, अशी आपली ओळख त्यांनी उघड केली.  त्या पुढच्या मुद्यात फडणवीस यांच्या अपेक्षेवर बोलताना आमदार रोहित पवारांचा उल्लेख करून झीरवाळ म्हणाले, "मी उपाध्यक्ष झाल्याने विरोधकांकडील बाकांवर बसेन. मी इकडे बसणार म्हटल्यानंतर मला आपले आमदार म्हणतात, तुम्ही तिकडे गेलात आहात. काही सेटलमेंट करून त्यांच्याकडे जाल बघा.... पण मी तसे काही करणार नाही. मी साधा माणूस आहे. माझ्या मोबाईलवरील सगळे फोन मीच घेतो. काहीजण म्हणतात 'पीए'ने फोन घ्यायचा असतो. पण मी तसे काही करीत नाही. एवढे फोन घेऊन माझा डावा कान निकामी होत आला आहे,''

झीरवाळांच्या नव्या जागेच्या डाव्या बाजुला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जागा आहे. त्या मुळे'डावा कान आणि डाव्या बाजुचे फडणवीस' या झीरवाळांच्या या जबरदस्त टोल्याने सारे सभागृहच हास्यात बुडाले. मुख्यमंत्री ठाकरे, अजितदादा, जयंत पाटील यांना काही वेळ हसू आवरणं शक्य होत नव्हते; तेव्हाच आपल्या जागेत उभे राहून जयंत पाटील म्हणाले, "डावा कान जड असणाऱ्या उपाध्यक्षांच्याच शोधात मी होतो." हे सांगतानाही पाटील खळखळून हसत होते. 'मी साधा असलो तरी, "मला आता स्वभावात नानांसारखा बदल करावा लागेल,'' झीरवाळ यांच्या या चिमट्याने नाना पटोलेही खूप वेळ हसत राहीले. कसेबसे हसू आवरत एका क्षणी तर अजितदादा म्हणाले, ''अहो इतकं ताणू नका, नरहरी!'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com