युती नसती तर आघाडी देश लुटायला सज्ज झाली असती : नितीन बानुगडे पाटील

युती नसती तर आघाडी देश लुटायला सज्ज झाली असती : नितीन बानुगडे पाटील

महाबळेश्वर : भाजपा-शिवसेना युती होऊ नये यासाठी आघाडीने देव पाण्यात बुडविले होते. युती होणार नाही असे वातावरण होते तेव्हा अनेक धुरंधर नेते मी लोकसभा लढणार असे म्हणत होते. परंतु युती जाहीर झाली तेव्हा लढणार म्हणणारे अनेक रथी महारथींनी शेपूट घातले. मी लढणार नाही असे जाहीर करू लागले. जर युती झाली नसती तर आघाडी पुन्हा देश लुटायला सज्ज झाली असती. ही संधी त्यांना पुन्हा मिळु नये म्हणुनच युती करण्याचा निर्णय आम्ही घेतला असुन सातारमध्ये परिवर्तन घडविल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा शब्दात शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी आघाडीच्या नेत्यांवर घणाघात केला. 

भाजप, शिवसेना व घटकपक्षांच्या महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी वाई, महाबळेश्वर, खंडाळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेतला. आपल्या शुर जवानांनी प्राणाची बाजी लाऊन पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. या अतुलनीय शौर्याचे पुरावे काहीजण मागत आहेत, ही लाजीरवाणी बाब आहे. आता भारत बदललाय याची प्रचिती सर्वांना आली आहे. परंतु गेल्या पन्नास वर्षात अनेक वेळा दहशतवादी हल्ले आपल्यावर झाले परंतु कॉंग्रेस सरकारने काय केले नाही, फक्त दम दिला. परंतु आता नरेंद्र मोदी यांनी उरी पाठोपाठ पुलवामा हल्ल्यांचा बदला घेतला आणि तुमच्या घरात घुसून प्रतिहल्ला करण्याची ताकत भारतामध्ये आहे हे सिध्द करून दाखविले. त्यामुळे असा आत्मविश्वासाने निर्णय घेणारे सरकारचे हात बळकट केले पाहिजेत असे त्यांनी सांगितले. 

इंदिरा गांधी यांनी पूर्वी गरिबी हटावची घोषणा दिली होती. आता पुन्हा तीच घोषणा त्यांचे नातु राहुल गांधी देत आहेत. मग 50 वर्षे तुम्ही काय करत होता, असा सवाल करून आज आपल्या देशाने मिशन शक्ती यशस्वी करून अंतराळा क्षेत्रात जगात चौथा देश होण्याचा मान मिळविला. यामुळे सर्व भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. जिल्हयातील प्रश्न लोकसभेत मांडुन ते सोडविण्याचे काम विदयमान खासदार करतात का, असा प्रश्न उपस्थित करून उमेदवार नरेंद्र पाटील म्हणाले, युवकांना रोजगार मिळावा यासाठी काही प्रयत्न झाले का ? पदवीपर्यंत शिक्षण घेऊन आज आपल्या जिल्हयातील अनेक युवक मुंबईत माथाडी कामगार म्हणुन जीवन जगत आहेत. जिल्हयात सर्व थरात खूप रोष आहे. हा सर्व मतपेटीतुन बाहेर पडुन जिल्हयात परीवर्तन घडल्या शिवाय राहणार नाही. शिवसेनेचे प्रभारी जिल्हा प्रमुख्य यशवंत घाडगे यांनी प्रास्ताविक केले. भाजपाचे अनुप सुर्यवंशी यांनी आभार मानले. 

या वेळी माजी जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम जाधव, माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर, राजेश कुंभारदरे, भा.ज.पाचे माजी जिल्हा प्रमुख अविनाश फरांदे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रणजितसिह भोसले, उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे, शिवसेना महीला आघाडी संघटक शारदा जाधव, नगरसेवक रविंद्र कुंभारदरे, संजय पिसाळ, माजी जिल्हा प्रमुख गोपाळ वागदरे, तालुका प्रमुख संजय शेलार, लीलाताई शिंदे, महेश शिंदे, विजय नायडु, गोपाळ वागदरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com