मोदींची नोटबंदी पार फसली ,काळा पैसा बाहेर आलाच नाही : शरद पवार

"आर्थिक स्तरावरील अपयशानंतर आता सरकारने रिझर्व्ह बँक, सीबीआय, ईडी या सारख्या संस्थांवर अप्रत्यक्ष हल्ला सुरु केला आहे. रिझर्व्ह बँकेकडे पैशांची मागणी करणे, सीबीआयमधील प्रमुखांबाबत धरसोडीचे निर्णय घेणे या बाबी चिंताजनक आहेत. स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली असे कधी घडले नव्हते. बँक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांवर अटकेची झालेली कारवाईही चुकीची होती. त्याचा परिणाम बँकांच्या अर्थपुरवठ्यावर झाला . - शरद पवार
SHARAD_PAWAR_MODI
SHARAD_PAWAR_MODI

बारामती शहर : "  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी   घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात किमान वर्षभर तरी मंदीचे वातावरण कायम राहील . आगामी निवडणूकीत सत्ताबदल झाला तरच काही प्रमाणात गुंतवणूकीबाबतचे चित्र बदलू शकेल.  अन्यथा अनेकांनी दिवाळे काढल्याच्या बातम्या आल्या तर आश्चर्य वाटायला नको," अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देशाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. 

दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला शरद पवार बारामतीच्या व्यापा-यांशी सुसंवाद साधतात.  येथील दि मर्चंटस असोसिएशनच्या वतीने आयोजित  कार्यक्रमात शरद पवार यांनी तासभराच्या भाषणात अनेक मुद्यांवर विश्लेषण केले. 

पवार म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य  आर्थिक निर्णय घेतले नाहीत .  अनेक अर्थकारणाशी संबंधित निर्णय चुकल्याने सध्याच्या मंदीचे चित्र दिसत आहे. एकीकडे बहुमातातील सरकार असतानाही अर्थव्यवस्था व प्रशासन व्यवस्था रुळावर  नाही. देशातील क्रयशक्ती असलेल्या घटकांचा खरेदीचा तर दुसरीकडे गुंतवणूकीची क्षमता असलेल्यांचा गुंतवणूकीचा मूडच नसल्याने त्याचा परिणाम बाजारातील छोट्या व्यापा-यांवर होताना दिसतो आहे." 

" थेट परकीय गुंतवणूकीस दरवाजे मोकळे केल्याने देशातील छोट्या व्यापा-यावर विपरीत परिणाम झाल्याचा आरोप करीत पवार यांनी सांगितले की, एकीकडे प्रचंड आर्थिक ताकद असलेल्या जागतिक संस्था व दुसरीकडे दुबळे स्थानिक व्यापारी यांच्यात स्पर्धा होऊच शकत नाही परिणामी छोट्या व्यापा-यांवरच त्याचा मोठा परिणाम जाणवणार आहे. मंदीच्या संकटाचे दूरगामी परिणाम अर्थव्यवस्थेवरही जाणवतील ,"अशी भीती व्यक्त करुन या काळात आपण धीराने या संकटाचा सामना करायला हवा असेही शरद पवार  म्हणाले. 

काळा पैसा बाहेर आलाच नाही 

" काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केलेली नोटबंदी ही तर पार फसली, नोटबंदीने ना काळा पैसा बाहेर आला ना दहशतवादी कारवाया थांबल्या. लोकांना प्रचंड मनस्तापझाला .  नवीन नोटा छपाईसाठी  अवाढव्य खर्च  झाला .  चलनटंचाईच्या तुटवड़याने बाजारात आर्थिक अस्थिरता  निर्माण झाली . या मुळे अर्थव्यवस्थेची वाटचाल बिकटच झाली ," अशी  टीका शरद पवार यांनी केली. 

"नोटबंदीनंतर मोठ्यांच घबाड बाहेर निघणार म्हणून अनेक जण खूष होते, पण स्वित्झर्लंड सरकारने स्विस बँकेच्या खात्यांबाबत माहिती देण्यास असमर्थता दर्शविली, नोटबंदीनंतर दोन वर्षानंतरही काळा पैसा कुठे गेला हे सरकारमधील कोणीच सांगू शकत नाही.  दोन वर्षानंतर देशाचे अर्थमंत्री सांगत आहेत की, लोकांकडे असलेला पैसा बाजारात यावा,  कर देणारा घेणारा वर्गाचे नेटवर्क वाढावे या उद्देशाने आम्ही नोटबंदीचा निर्णय घेतला होता. " असेही ते म्हणाले . 

देशाच्या सर्वोच्च संस्थेतील सरकारचा वाढता हस्तक्षेप लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक आहे अशी भीती पवार यांनी बोलून दाखविली. 

यावेळी अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर, माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सदाशिव सातव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com