जेलच्या दरवाज्यापर्यंत नेले...आता आतच टाकू : मोदींचा वढेरांना इशारा

जेलच्या दरवाज्यापर्यंत नेले...आता आतच टाकू : मोदींचा वढेरांना इशारा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी कुटुंबाचे जावई राॅबर्ट वढेरा यांना इशारा दिला असून, त्यांना सत्तेवर आल्यानंतर तुरुंगात टाकण्याचा निर्धार व्यक्त  केला.

``जनतेच्या आशीर्वादाने हा चौकीदार शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना तुरुंगाच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन गेला आहे. आता त्यांना जामिनासाठी कोर्टाचे आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) उंबरठे झिजवावे लागत आहे. त्यांना कारागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत नेले असून पुढील पाच वर्षांमध्ये त्यांना तुरुंगात टाकू,`` अशा शब्दांत मोदींनी आपला इरादा व्यक्त केला.

त्यांनी थेट वढेरा यांचे नाव घेतले नाही. पण हा इशारा आपल्याकडेच आहे असे समजून वढेरांनी आपली बाजू मांडणारी एक पोस्ट मोदींच्या भाषणानंतर सोशल मिडियात लिहिली. हे सरकार गेली पाच वर्षे मला त्रास देत आहे. प्रचारसभांत माझे नाव वापरून मला बदनाम करू नका. या देशातील न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. तेथे सत्य काय ते उघड होईल, अशा शब्दांत त्यांनी मोदींना आवाहन केले आहे.   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरयाणामधील फतेहाबाद येथे बुधवारी सभा घेतली. मोदी म्हणाले, पाच टप्प्यांमधील मतदान झाले असून आता चित्र स्पष्ट झाले आहे. केंद्रात भाजपाचीच सत्ता येणार. काँग्रेस देशाच्या सुरक्षेबाबत काहीच बोलू शकत नाही. २०१४ पूर्वी पाकिस्तान दररोज सीमेवर कुरापती करत होता. देशाच्या विविध भागांमध्ये दहशतवादी हल्ले व्हायचे. पण सरकार काहीच करत नव्हते. तुम्ही देशाच्या सुरक्षेला भक्कम केल्याशिवाय जागतिक महासत्ता होऊ शकत नाही. काँग्रेस आणि त्यांच्या ‘महामिलावटी’ साथीदारांनी देशाच्या सुरक्षेबाबत भाष्य केले आहे का?, जो स्वत:च्या देशाचे रक्षण करु शकत नाही, तो दुसऱ्यांचे काय रक्षण करणार, असा सवालही मोदींनी विचारला.

आता आमचे सैन्याचे जवान दहशतवाद्यांच्या तळांवर घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करतात. भाजपाच्या काळात आधी सर्जिकल स्ट्राइक झाले आणि मग बालाकोट येथे एअर स्ट्राइक करण्यात आले, असे मोदींनी सांगितले. पाकिस्तानला आता मसूद अझरवर कारवाई करण्यासाठी भाग पाडले असून सत्तेत असताना काँग्रेस सरकार अशी कारवाई का करु शकली नाही, असा सवालही त्यांनी विचारला.भारत माता की जय, अशा घोषणा देण्यावर आक्षेप घेणाऱ्या काँग्रेसने आता देशद्रोहचे कलम रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. भारताला शिवीगाळ करणाऱ्या, तिरंग्याचा अपमान करणाऱ्या आणि नक्षलवाद्यांच्या समर्थकांना दिलासा मिळावा, हेच काँग्रेसला हवं असल्याचे मोदींनी सांगितले.

रणरणत्या उन्हात, भर पावसात आणि कडाक्याच्या थंडीत पोलीस ड्यूटीवर असतात. स्वातंत्र्यानंतर देशभरात एकूण ३३ हजार पोलीस शहीद झाले. काँग्रेसने त्यांचा सन्मान केला नाही, असा आरोप त्यांनी केला. जनतेच्या आशीर्वादामुळे हा चौकीदार शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना न्यायालयापर्यंत घेऊन गेला आहे. आता त्यांना तुरुंगाच्या प्रवेशद्वारापर्यंत नेले असून पुढील पाच वर्षांमध्ये ते तुरुंगात असतील, असे त्यांनी सांगितले. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी रॉबर्ट वढेरा अडचणीत आले असून त्यांची ईडीमार्फत चौकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी हे विधान केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com