Narendra Modi is still most popular leader : Prashant Kishor | Sarkarnama

नरेंद्र मोदी अजूनही सर्वाधिक लोकप्रिय नेते :  प्रशांत किशोर

पीटीआय
शनिवार, 15 डिसेंबर 2018

भारतीय जनता पक्षाच्या 2014 च्या निवडणूक मोहिमेच्या आखणीत प्रशांत किशोर यांची महत्त्वाची भूमिका होती.

पाटणा :  "पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. हिंदी भाषिक राज्यातील पराभवामुळे भाजपासाठी धोक्‍याची घंटा वाजलेली नाही,'' असे मत पॉलिटिकल स्टॅटेजिस्ट आणि जे.डी. (यु) चे उपाध्यश्र प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे.
 

भारतीय जनता पक्षाच्या 2014 च्या निवडणूक मोहिमेच्या आखणीत प्रशांत किशोर यांची महत्त्वाची भूमिका होती. बिहारमध्ये जनता दल युनायटेडचे नेते नीतिश कुमार यांच्या 2015 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी राजकीय सल्लागार म्हणून काम केले होते.प्रशांत किशोर यांच्या कामामुळेच प्रभावित झालेल्या नीतिशकुमार यांनी त्यांना पक्षाचे उपाध्यक्ष केले आहे.

लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या गेलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भाजपला अपयश आले. विशेषतः मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यातील सत्ता गेली. या पार्श्‍वभूमीवर भाजपमध्ये अस्वस्थता असून आता राम मंदिराचा मुद्दा पुन्हा व्यापक स्वरूपात समोर आणण्याच्या हालचाली सुरू आहेत.

यावर भाष्य करताना प्रशांत किशोर म्हणाले, " भाजप 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जेवढा बलवान होता तेवढा आता नाही. भाजपचा 2004 मध्ये पराभव झाला किंवा 2009 मध्ये देशाची सत्ता संपादन करू शकला नाही. या दोन्ही वेळी भारतीय जनता पक्ष जेवढा कुमकुवत होता तेवढा आता राहिलेला नाही.''

श्री. प्रशांत किशोर पुढे म्हणाले, " भाजपने 2014 मध्ये प्रचार मोहिमेत विकास हा प्रमुख मुद्दा बनवलेला होता. येत्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने विकास हाच प्रमुख मुद्दा बनवला पाहिजे. राम मंदिराचा विषय प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवू नये.''

" नरेंद्र मोदी यांच्या 2014 च्या निवडणूक प्रचार मोहिमेत माझा सहभाग होता. राम मंदिराचा मुद्दा न घेताही भाजपने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे यापुढेही असे वादग्रस्त विषय न घेता भाजपने निवडणूक लढवावी,'' असे प्रशांत किशोर म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख