'विकास गांडो थायो छे'ला मोदींचे जन्मभूमीत प्रत्युत्तर

छोटेसे वडनगर ही मोदींची जन्मभूमी. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ते अनेकदा गुजरातला तर आले; पण जन्मगावी एकदाही आले नव्हते. सारा गाव तीन वर्षांपासून त्यांच्या प्रतीक्षेत होता. अखेर 8 ऑक्‍टोबरला हा योग जुळून आला आणि पूर्ण दिवस मोदी यांनी गाव आणि गावाकडच्या मित्रांसाठी दिला.
'विकास गांडो थायो छे'ला मोदींचे जन्मभूमीत प्रत्युत्तर

वडनगर (गुजरात) : सुमारे दोनेक लाखांचा जनसमुदाय 'मोदी, मोदी....' चा जयघोष करत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे राहिले. हळुवारपणे त्यांनी बोलायला सुरवात केली; त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये जोरदार टोलेबाजी सुरू केली आणि मग साऱ्या शामियान्यात पुन्हा एकच आवाज घुमू लागला - मोदी ऽऽ मोदी ऽऽ मोदी...

छोटेसे वडनगर ही मोदींची जन्मभूमी. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ते अनेकदा गुजरातला तर आले; पण जन्मगावी एकदाही आले नव्हते. सारा गाव तीन वर्षांपासून त्यांच्या प्रतीक्षेत होता. अखेर 8 ऑक्‍टोबरला हा योग जुळून आला आणि पूर्ण दिवस मोदी यांनी गाव आणि गावाकडच्या मित्रांसाठी दिला. गावी यायचे म्हणजे रिकाम्या हातांनी जाऊन कसे चालणार? वडनगरमध्ये चारशे कोटी रुपये खचूर्न उभारलेल्या सातशे खाटांच्या अतिभव्य रुग्णालयाचे आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले, शिवाय गावासाठी काहीशे कोटींच्या योजनांचा शुभारंभही त्यांनी केला. मोदी यांनी उद्‌घाटनानंतर रुग्णालयाचा फेरफटका मारत असताना सर्व अधिकारी त्यांचे जोशात स्वागत करत होते, तेवढ्यात एक मानवी सापळा त्यांच्या दृष्टीस पडला. व्यवस्थापनाने त्यालादेखील हात जोडून उभे केले होते. त्याकडे त्यांनी विनोदी कटाक्ष टाकला.

मोदींनी आधी हटकेश्‍वर शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन सुमारे अर्धा तास पूजा केली. जाहीर सभेला जाण्यापूर्वी गावातून विशाल रॅली काढण्यात आली. यावेळी त्यांनी त्यांची शाळा बी. एन. हायस्कूलला भेट दिली तेव्हा तेथील माती कपाळाला लावली. ते थोडेसे भावूक झाल्याचे दिसले. त्यांचे बालपण याच शाळेत गेले होते. त्यांना भेटण्यासाठी त्यांचे तेव्हाचे मित्रही आले होते. त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर सभेसाठी बनवण्यात आलेल्या खास 'वॉटरप्रूफ' शामियान्याकडे रवाना झाले.

मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याचे कारण म्हणजे गुजरातची निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेसने 'विकास गांडो थायो छे' म्हणजे विकास वेडा झाला आहे, या वाक्‍याभोवती जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यावर गावचे सुपुत्र आणि 'वडाप्रधान' (गुजराती) असलेले मोदी गप्पच होते. विविध सरकारी योजनांच्या शुभारंभाची घोषणा करत आणि माहिती देत मोदी अखेर 'विकास' या मुद्यावर आलेच. आपले गाव आणि परिसरातील रुग्णांसाठी अतिभव्य रुग्णालय उभारण्यात आले आहे, त्यामुळे गंभीर आजारांवर आता येथेच उपचार मिळतील, असे सांगताना 'विकास हाच आपला अजेंडा राहील', असे ते म्हणाले.

वडनगरच्या ऐतिहासिक तलावावरील प्रस्तावित तरंगत्या पुलाचा उल्लेख करत, 'हा पूल व्हायला हवा की नाही?' असा सवाला मोदींनी तीन-चार वेळा केला. त्याला सभेतून जोरदार प्रतिसाद मिळाला - झालाच पाहिजे. मग मोदी म्हणाले, 'आ हॅंगिंग ब्रीज बने तो तमने गम छे, आ मेडिकल कॉलेज बने तो तमेने गमी, नऊ सरस रेल्वे स्टेशन बने तो गम्यू, तो विकास जरूरी छे, विकास जरूरी है या नही, (गर्दीतून एकच जयघोष) तो तुम्हारा हॅंगिंग पूल कर के देंगे.' "जय हटकेश'च्या घोषणेने त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com