मोदींनी राष्ट्रवादीचं कौतुक केल्याने 'भाजप पुन्हा येणार'?

आज दिल्लीत पोचलेले शरद पवार महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसंबंधी सकारात्मक, खात्रीशीर सांगतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी पत्रकारांना अक्षरश: उडवून लावले. सत्तास्थापनेचं भाजप- शिवसेनेला विचारा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर लगेचच मोदींनी केलेलं राष्ट्रवादीचं कौतुक भुवया उंचावणारे आहे. त्यामुळे जोपर्यंत शरद पवार शिवसेनेला जाहीर पाठिंबा देण्याची भुमिका घेत नाहीत, तोपर्यत भाजप- राष्ट्रवादी मैत्रीची चर्चा चालू राहू शकते.
मोदींनी राष्ट्रवादीचं कौतुक केल्याने 'भाजप पुन्हा येणार'?

पुणे: राज्यातील सत्तास्थापनेत अतिशय महत्वाची भुमिका असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचं टेन्शन वाढवलं आहे. आज सकाळी दिल्लीत शरद पवारांनी तयार केलेला संभ्रम आणि त्यानंतर मोदींनी राज्यसभेत केलेले कौतुक पाहता शिवसेनेचा अवसानघात होतोय की काय, अशी परिस्थिती तयार होवू लागली आहे.

विधानसभेचा निकाल 24 ऑक्टोंबरला लागला, मात्र कोणालाही सत्ता स्थापन करता आलेली नाही. परिणामी राष्ट्रपती राजवट सुरू आहे. यापरिस्थितीत शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस हे तीन पक्ष एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात सर्वाधिक महत्वाची भुमिका राष्ट्रवादी पक्षाची आहे. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आणि काँग्रेस धर्मनिरपेक्षवादी पक्ष असल्याने, या भिन्न टोकाची विचारधारा असणाऱ्या पक्षांना एकत्रित आणण्याची भुमिका राष्ट्रवादीला पार पाडावी लागत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत. ते काय डावपेच करतात, त्यावरच राज्याची सत्ता अवलंबून असणार आहे. 

ज्यावेळी शिवसेनेचे शिष्टमंडळ सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनात गेले, त्यावेळी पाठिंब्याचे पत्र देण्यासंबंधी काँग्रेस कोअर कमिटीची दिल्लीत बैठक सुरू होती. मात्र हे पत्र देण्यापुर्वी दोन दिवस थांबून चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी सूचना शरद पवार यांनी काँग्रेस नेते अहमद पटेल यांना केली. त्यामुळे काँग्रेसचे पाठिंब्याचे पत्र तयार झाले नाही आणि राजभवनापर्यंत पोहचले नाही. परिणामी शिवसेनेचा पहिल्याच प्रयत्नात अवसानघात झाला.

यासंबंधाने खुलासा करताना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पवारांमुळेच काँग्रेसने पाठिंब्याचे पत्र पाठवले नाही, असे म्हटले होते. त्यामुळे शिवसेनेचा सर्वाधिक भरवसा असलेले पवार वेगळा डाव खेळतात की काय, अशी चर्चा त्यावेळीच सुरू झाली आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे भाजपविरोधी सरकार यावे, या मताचे नाहीत. त्यांची इडी चौकशी सुरू आहे, त्यामुळे भाजपला आणखी दुखावू नये, अशी त्यांची इच्छा आहे. यासंदर्भाने प्रसंगी राष्ट्रवादीच भाजपला सत्तेसाठी अप्रत्यक्ष मदत करेल, अशी चर्चा गेल्या तीन दिवसांपासून आहे.

यापार्श्वभुमीवर पुण्यात काल राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार हे सत्तास्थापनेसंदर्भात दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतील, असे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जाहीर केले, मात्र आज दिल्लीत पवारांना यासंबंधाने विचारले असता 'सरकार स्थापनेबद्दल भाजप- शिवसेनेला विचारा' असा सल्ला त्यांनी पत्रकारांना दिला. भाजप विरोधातील सरकार बनवण्यासाठी फार उत्सुक नसल्याचे त्यांनी जाणवून दिले. त्यानंतर थोड्या वेळात पंतप्रधान मोदी यांचे राज्यसभेत भाषण झाले. राज्यसभेचं 250 वे सत्र असल्याने मोदींचे हे संबोधन होते. मोदींनी संसदीय परंपरांवर भाष्य करत असताना राष्ट्रवादीचे कौतुक केले. ते म्हणाले, ''राष्ट्रवादीचे लोक कधिही वेलमध्ये आले नाहीत. त्यांनी चांगल्या पद्धतीने परंपरा पाळल्या. ते वेलमध्ये आले नाहीत, म्हणून त्यांचे कोठे नुकसान झालेले नाही. त्यांनी आपली विकासाची भुमिका चांगल्या प्रकारे निभावली आहे. राष्ट्रवादीचा आदर्श इतर पक्षांनी घेतला पाहिजे. अगदी भाजपनेही घेतला पाहिजे.'' 

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा निर्णायक वळणावर असताना मोदींनी राष्ट्रवादीचे कौतुक केल्याने पुन्हा नव्या समीकरणांची मांडणी सुरू झाली आहे. 2014 मध्ये राज्यात अल्पमतात असणाऱ्या भाजप सरकारला राष्ट्रवादीने न मागता पाठिंबा दिला होता. या सहकार्यामागे मोदी आणि पवार यांचे घनिष्ट मित्रत्वाचे संबंध आहेत. त्या संबंधाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फायदा यावेळीही भाजपला मिळेल, असे सद्यातरी मानले जात आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील ही नेतेमंडळी पुन्हा भाजपचेच सरकार येणार असे ठासून सांगत आहेत.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com