नरेंद्र मोदी यांनी दिला विद्यार्थ्यांना यशाचा आणि समृद्ध जीवनाचा मंत्र...

तंत्रज्ञानाचा वापर आपल्या गरजेनुरूप करावा. स्मार्ट फोन आपल्या वेळेची चोरी करतो त्यामुळे सारखे त्याच्याशी खेळण्यापेक्षा दिवसातले एक दोन तास त्यापासून दूर राहून घरातील वडीलधाऱ्यांबरोबर वेळ घालवा व घरातील एका खोलीत मोबाईलचा प्रवेश वर्ज करा असेही मोदी म्हणाले.
 नरेंद्र मोदी यांनी दिला विद्यार्थ्यांना यशाचा आणि समृद्ध जीवनाचा मंत्र...

नवी दिल्ली : जीवनात अपयशच आले नाही, अशी व्यक्ती या जगात विरळाच असेल. पालकांनी मुलांना केवळ मार्कांच्या फुटपट्ट्या लावून परीक्षेला सामोरे जाऊ देऊ नये व तुम्हाला यशाकडे नेण्याचा मार्ग अपयशच दाखवते अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वी व 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या कसोटीतून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना इतरांशी तुलना न करण्याचा व पालकांच्या दबावातून परीक्षेचा अतिरिक्त ताण न घेण्याचा मंत्र दिला. अभ्यासासाठी पहाटेचा व सूर्योदयाची वेळ चांगली असते कारण तेव्हा मन प्रसन्न असते असेही ते म्हणाले. 

मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे तालकटोरा आच्छादित मैदानात झालेल्या " परीक्षा पे चर्चा ' या संवाद कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात पंतप्रधानांनी देशविदेशातील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. महाराष्ट्राची प्रेरणा, जबलपूरची प्राजक्ता अतनकर, केरळचा अरिन डॉमनिक, पंजाबची अरदीप कौर, आंध्रप्रदेशाचा तावेद पॅंवार, अरूणाचल प्रदेशाची तापी अगु तसेच टांझानियाची शाखा खान आदी निवडक विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना पंतप्रधानांनी वेस्ट इंडिजविरूध्द जखमी होऊनही लारासारख्या फलंदाजाला बाद करणारा अनिल कंबळे व ऑस्ट्रेलियाविरूध्दचा सामना प्रतीकूल स्तितीत खेचून आणणारेराहूल द्रविड व व्हीव्हीस लक्ष्मण यांची उदाहरणे दिली. ज्या चांद्रयानाचे यश पहायला आपण रात्रभर जागलो त्याच्या अपयशानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीत परतण्याचा कार्यक्रम लांबवून आपण तेथे शास्त्रज्ञांशी संवाद साधला व त्यांच्या निराशेला आशेत परावर्तित करण्याचा प्रयत्न केला आणि तो पाहून साऱ्या हिंदुस्तानातच नव्या आशेचा संचार झाल्याचे पहायला मिळाले, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. 

सांगितले की तंत्रज्ञानाचा वापर आपल्या गरजेनुरूप करावा. स्मार्ट फोन आपल्या वेळेची चोरी करतो त्यामुळे सारखे त्याच्याशी खेळण्यापेक्षा दिवसातले एक दोन तास त्यापासून दूर राहून घरातील वडीलधाऱ्यांबरोबर वेळ घालवा व घरातील एका खोलीत मोबाईलचा प्रवेश वर्ज करा असेही मोदी म्हणाले. केवळ अभ्यास नव्हे तर साहित्य, संगीत, कला क्रीडा यांच्याविना अभ्यासच करत राहिलात तर तुमचा रोबो होईल, असे सांगताना ते म्हणाले की परीक्षेवेळी पेपर समोर आला की सोपे वाटणारे प्रश्‍न आधी सोडवा. आपला मूड ऑफ करण्यात बाहेरच्याच गोष्टी जास्त असतात. आणि केवळ परीक्षेत किती मार्क मिळतात हेच आयुष्य नव्हे हे लक्षात ठेवा. परीक्षा हा केवळ थांबा किंवा साधन आहे ते साध्य असत नाही. करियर निवडताना तुमची क्षमता, योग्यता व इच्छा काय, त्यानुसार निवड करा. कोणाच्या दबावाखाली आपल्या आयुष्याचा निर्णय करू नका असाही त्यांनी सल्ला दिला. पालकांनीही आपल्या पाल्याची क्षमता पाहून अपेक्षांचे ओझे टाकावे असेही ते म्हणाले. 

मोदींचे मंत्र : 
- 2020 केवळ नवे वर्ष नाही तर एका दशकाचा प्रारंभ आहे. या दशकातील देशाच्या समृध्दी व विकासात यंदाच्या 10 वी 12 वीच्या विद्यार्थांचे सर्वाधिक योगदान असेल. 
- आज माझ्यासमोर तुम्ही जे बसला आहात तो नवा भारत आहे. 2047 मध्ये स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना देशाचे नेतृत्व तुमच्याकडे असेल. जेव्हा तुम्ही 30-40 वर्षांनी यशस्वी व्हाल तेव्हा मी जिवंत असलो तर मला अभिमान वाटेल की याच मुलांबरोबर मी 20 जानेवारी 2020 रोजी संवाद साधला होता. 
- एखाद्या गोष्टीत तुम्ही अपयशी झालात तर त्याचाच अर्थ तुम्ही यशाकडे वाटचाल करू लागलात असा आहे. 
- एखाद्या व्यक्तीचा संकल्प कित्येकांसाठी प्रेरणास्थोत बनतो. 
- परीक्षेत मार्कांच्यामागे धावू नका. अमूक मार्क मिळाले नाहीत तर पालकांनी जगच बुडाल्यासारखे मुलांशी वागू नये. 
- हा काळ तंत्रज्ञानाचा आहे पण स्मार्ट फोनसारखे तंत्रज्ञान तुम्ही कसे वापरता यावर अवलंबून आहे. स्मार्टफोन तुमचा जेवढा वेळ खातो किंवा चोरतो त्याच्या 10 टक्के वेळ आई वडील, आजी आजोबांबरोबर घालवा. 
- पालक व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा अंदाज आला पाहिजे. मुलांवर जेवढा दबाव आणाल तेवढे ते त्रस्त होत जातील. 
- रात्रीच्या वेळी तुमचे शरीर व मन थकलेले असते व ते सकाळी ताजेतवाने असते. तेव्हा तीच वेळ अभ्यासासाठी योग्य आहे. 
- दुसऱ्याचे पाहून किंवा त्याच्याशी तुलना करून नव्हे तर आपल्या मनाला ज्यात आनंद मिळतो तेच काम करा. नवनवीन गोष्टी समजून घेणे यालाच जीवन जगणे असे म्हणतात. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com