काश्‍मीरमधील नागरी स्वातंत्र्य पुन्हा निर्माण करा : विचारवंतांचे पंतप्रधानांना पत्र

काश्‍मीरमधील नागरी स्वातंत्र्य पुन्हा निर्माण करा : विचारवंतांचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई : ऑगस्ट महिन्यापासून जम्मू-काश्‍मीरमध्ये लागू करण्यात आलेल्या निर्बंधांविरोधात समाजातील विचारवंतांनी आवाज उठवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काश्‍मीरमध्ये नागरी स्वातंत्र्य पुन्हा आणण्यासाठी समाजातील सर्व घटकांशी सहानुभूतीने संवाद सुरू करावा; तेथील कारभारात पारदर्शकता आणावी, असे आवाहन करण्यात आले. नेतृत्वहीन समाज हा अराजकाला आमंत्रण देत असतो, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच भारतीय बोली भाषांचे अभ्यासक डॉ. गणेश देवी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ. जी. जी. पारीख, सेवाग्राम कलेक्‍टिव्हचे डॉ. सुमन बरंठ, खुदाई खिदमदगार भारतचे राष्ट्रीय संयोजन आशिष नंदी, मलिका साराभाई, प्रकाश शहा, रामदास भटकळ, फैजल खान, स्वराज्य अभियानचे अरविंद अंजुम आणि संजीव साने यांनी हे पत्र लिहून काश्‍मीरप्रश्‍नी चिंता व्यक्‍त केली आहे. 

ऑगस्ट महिन्यात जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम हटवण्यात आल्यानंतर स्थानिक नेते, सामाजिक कार्यकर्ते अटकेत आहेत; तसेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. येथील नागरिक स्वातंत्र्यापासून वंचित असल्याने अत्यंत हलाखीच्या आणि तणावाच्या स्थितीत आहेत. लहान मुलांच्या मनावरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. राष्ट्रउभारणीची निरंतर प्रक्रिया ही राष्ट्रातील जनतेच्या भावनिक अनुबंधावर अवलंबून असते. नागरी स्वातंत्र्याशिवाय व्यक्ती आणि सामाजाची प्रगती शक्‍य नाही हे इतिहासाने सिद्ध केले आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

समाजातील सर्व घटकांशी सहानुभूतीने संवाद सुरू करावा, शांतता आणि सलोख्याच्या मार्गाने जम्मू-काश्‍मीरमधील दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणावे, असे या पत्रात म्हटले आहे. 5 ऑगस्टपासून अटकेत आणि स्थानबद्ध असलेले राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेची सुटका करावी. स्वतंत्र निरीक्षक आणि माध्यमातील व्यक्तींना मुक्त संचारास परवानगी देऊन तेथील कारभारात पारदर्शकता आणावी, असेही आवाहन पत्रात करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com