"सीसीए' वर संसदेत बचावात्मकता नको - मोदी : एनडीए बैठकीत आक्रमकतेचे संकेत

 "सीसीए' वर संसदेत बचावात्मकता नको - मोदी : एनडीए बैठकीत आक्रमकतेचे संकेत

नवी दिल्ली : नागरिकत्व संशोधन कायद्याबाबत (सीसीए) बचावात्मक भूमिकेत जाण्याचे आपल्या सरकारला काहीही कारण नाही. हा कायदा करून काहीही वाईट केलेले नाही, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत विरोधकांच्या संभाव्य आक्रमकतेला "धटासी असावे धट' या पध्दतीनेच प्रत्युत्तर दिले जाईल असे संकेत आज दिले. भाजप आघाडीच्या (एनडीए) संसदीय बैठकीत बोलताना मोदी यांनी, सीसीएवर मित्रपक्षांनीही सरकारला भक्कम साथ द्यावी असेही आवाहन केले. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात "सीसीए' विरोधाचे जोरदार पडसाद उमटण्याची शक्‍यता व्यक्त होत होती व त्याची झलक आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणात एकदा नव्हे दोनदा आलेल्या व्यत्ययातून दिसली. आगामी अधिवेशनात विरोधक विशेषतः राज्यसभेत सीसीए विरोधाचे वादळ आणणार असा अंदाज व्यक्त होतोय. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी भाजप आघाडीच्या बैठकीत सीसीएवर आपले सरकार ठाम राहणार असल्याचे स्पष्ट केले. एनडीए पक्षनेत्यांच्या संसद ग्रंथालयात झालेल्या बैठकीत बोलताना मोदींनी सीसीएवर आक्रमक प्रत्युत्तराचे स्पष्ट संकेत दिल्याने विरोधकांच्या गदारोळात एकादा जरी वाकडा शब्द निघाला तरी लोकसभेतील भाजपचे दणदणीत संख्याबळ तेवढ्याच आक्रमकतेने त्यास प्रत्युत्तर देणार हे मानले जाते. 

भारतीय अल्पसंख्यांक हे साऱ्या देशासाठी आपलेच आहेत, मोदी सरकार त्यांच्यावर काहीही संकट येऊ देणार नाही असे भाजपने स्पष्ट केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत मोदींनी सांगितले की सीसीए कायदा केला म्हणजे आपल्या सरकारने फार मोठी वाईट गोष्ट केली असा प्रचार सुरू आहे. प्रत्यक्षात आम्ही काहीच वावगे केलेले नाही. जर यात नागरिकत्व घेण्याची नव्हे तर देण्याची तरतूद असेल तर नागरिकांना निष्कारण भडकावले जात आहे. मात्र सरकार यापासून मुळीच माघार घेणार नाही. संसदेत याला विरोध झाला तर तुम्हीदेखील सीसीएमागे ठामपणे उभे रहावे असेही आवाहन मोदींनी मित्रपक्षांना केले. 

दरम्यान या बैठकीत नागालॅंड करार व त्रिपुरातील ब्रू जमातीसाठी केलेल्या तरतुदींबद्दल घटकपक्षांनी भाजप नेते म्हणून पंतप्रधानांचे अभिनंदन केले. नितीशकुमार यांच्या जदयूने व बादल पितापुत्रांच्या अकाली दलाने मोदी सरकारकडून, प्रस्तावित एनपीआरबाबतच्या शंकांचे निरसन करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. जनतेमध्ये विनाकारण गैरसमज वाढू नयेत यासाठी एनसीआर प्रक्रियेची सविस्तर माहिती सरकारने संसदेसमोर ठेवायला हवी अशीही भावना जदयूचे नेते लालन सिंह यांनी व्यक्त केली. त्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी, या विषयाबाबत मागणी आल्यास चर्चेची सरकारची तयारी आहे असे सांगितले. 

कामकाज करण्याची परंपरा कायम राखा- नायडू 
2019 निवडणुकीनंतर राज्यसभेत गेली दोन अधिवेशने अत्यंत चांगले कामकाज झाले आहे याचे स्मरण करून देतानाच, हे अधिवेशनही त्याला अपवाद ठरू नये अशी अपेक्षा राज्यसभेचे सभापती एम वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केली. अधिवेशनातील विषयांबाबत चर्चा करण्यासाठी नायडू यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत , कामकाज चालावे यासाठीच संसद असते असेही सांगितले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह विविध पक्षीय नेते उपस्थित होते. संसदीय अधिवेशन ही जनतेच्या जिव्हाळ्याचे मुद्दे लावून धरणे व सरकारकडून त्यांची सोडवणूक करणे यासाठी अतिशय चांगली संधी असते. गोंधळ करून ही सुवर्णसंधी वाया जाणार नाही, याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे असे नायडू यांनी सांगितले. आझाद म्हणाले की सरकारने विरोधकांच्या चिंता व शंकांबाबत संवेदनशील व सहिष्णू भूमिकेने वागावे अशी आमची अपेक्षा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com