narayan rane towards bjp | Sarkarnama

पिंपरी चिंचवडमधील कार्यकारिणीत राणेंचा भाजप प्रवेश ?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 एप्रिल 2017

गेले महिनाभर नारायण राणे हे नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यासोबत ते भाजपमध्ये जाणार, हेही सांगितले जात आहे. स्वतः: नारायण राणे यांनी या चर्चांचे स्पष्टपणे खंडन केलेले नाही. संभ्रम निर्माण करणारे खुलासे मात्र त्यांच्याकडून केले जात आहेत. या सर्व बाबींवरील पडदा भाजपच्या बैठकीत हटण्याची शक्‍यता आहे.

पुणे : माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या विषयाला आगामी दोन दिवसांत "फूल स्टॉप' मिळण्याची शक्‍यता आहे. पिंपरी चिंचवडमध्ये होत असलेल्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते भाजपवासी होतील, असे संकेत आहेत.

नारायण राणे यांचे पुत्र, रत्नागिरीचे माजी खासदार आणि राज्य कॉंग्रेसचे सचिव नीलेश राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत हा वाद सर्वांसमोर आणला. हे करत असताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वक्षमतेवर टीका केली. त्याचवेळी राणे कुटुंबीय इतर पक्षाच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर स्वतः: राणे यांनी इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांना मुलाखती देऊन नाराज असल्याचे सांगितले. तसेच स्वतः: राणेही मुख्यमंत्र्यांना भेटल्याच्या बातम्या आल्या. सिंधुदुर्गातील मेडिकल कॉलेजचा विषय खुलाशातून पुढे आणला जात होता, पण प्रत्यक्षात प्रवेशाच्या वाटाघाटी सुरू होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे व आमदार नीतेश राणे हे अहमदाबादला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गोपयिनपणे भेटायला गेले तेव्हा, हा प्रकार पुराव्यांसह सर्वांसमोर आला. त्यावेळी राणे खऱ्याअर्थाने एक्‍स्पोज झाले. त्यामुळे निर्णय घेतल्याखेरीज राणेंपुढे पर्याय राहिलेला नाही. या घटनेनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही राणेंच्या प्रवेशाबाबत सकारात्मक मत नोंदवले आहे. यापार्श्‍वभूमीवर दि. 26 व 27 रोजी होत असलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राणेंच्या भूमिकेचा "सस्पेन्स' संपेल, असे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. 

राज्यात इतरत्र भाजपचे जोरदार वातावरण आहे, मात्र तळकोकणात भाजपची अवस्था दयनीय आहे. राणेंच्या मुळे भाजप सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात स्ट्रॉंग होईल, त्यासोबत पक्षाला "स्ट्रॉग मराठा' लिडर मिळेल, या अँगलमधून भाजप या प्रवेशाकडे पहात आहे. राणेही दोन्ही मुलांचे करिअर भाजपमध्ये पहात आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख