narayan rane speech in dodamarg | Sarkarnama

लोकांसाठी खूप कामे केली, आता गोशाळा उभारणार: नारायण राणे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकणार, अच्छे दिन आणणार ते सगळं कुठे आहे, असेही ते म्हणाले.

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : खोटे बोलून जनतेचा विश्‍वासघात करणाऱ्या खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांना पुन्हा निवडून देऊ नका, असे आवाहन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी येथील सभेत केले. 

विश्‍वास यात्रेच्या निमित्ताने ते तालुका दौऱ्यावर होते. आपण माझ्यावर विश्‍वास ठेवा, तुमच्या प्रगतीची हमी मी देतो असेही ते म्हणाले.

पालकमंत्री केसरकर यांनी दोडामार्गमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठ महिन्यात आणण्याचे आश्‍वासन दिले. 20 दिवस उरलेत, परदेशातील विद्यापीठाला कोण मंजुरी देणार, हेच ज्यांना माहिती नाही ते विद्यापीठ कुठून आणणार, त्यांनी विद्यापीठ आणूनच दाखवावे, मी याच व्यासपीठावर त्यांचा सत्कार करतो, असे सांगून खासदार राणे म्हणाले, ""पेरियारच्या धर्तीवर तिलारीत पर्यटनस्थळ आणणार म्हणतात, रस्त्यासाठी कोट्यवधी आणल्याचे सांगतात. त्यांनी आतापर्यंत सांगितलेला एक तरी रुपया दिला काय? जो बोलतो; पण एक रुपयाही देत नाही अशा, थापा मारणाऱ्या केसरकरांना रस्त्यावर फिरू देऊ नका. विकास करण्याची त्यांची क्षमता नाही त्यामुळे त्यांना यापुढे निवडून देऊ नका, असेही ते म्हणाले.

खासदार राणे यांनी भाजपवरही टीका केली. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकणार, अच्छे दिन आणणार ते सगळं कुठे आहे, असेही ते म्हणाले. आपण आतापर्यंत लोकांसाठी खूप कामे केली, आता प्राण्यांसाठी काम करणार. लवकरच गोशाळा उभारणार, असेही ते म्हणाले.

दौऱ्याची सुरुवात मोरगाव येथील म्हातारा बाबांच्या दर्शनाने झाली. तेथून कुंब्रल आणि साटेली भेडशी येथे स्थानिक कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधला. साटेली येथील गणराज कला क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांशी खासदार राणे यांनी चर्चा केली. या वेळी तळेखोल, झरेबांबर आणि दोडामार्ग सावंतवाडा येथील अनेक युवकांनी स्वाभिमान पक्षात प्रवेश केला

या वेळी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष रमेश दळवी, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, रेश्‍मा सावंत, प्रीतेश राऊळ, विकास कुडाळकर, प्रमोद कामत, अशोक सावंत, संदीप कुडतरकर, शरद मिराशी, मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे, मेघा गांगण, प्रकाश गवस, संतोष नानचे, राजू निंबाळकर, विलास सावंत आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख