narayan kuche and bjp campaign | Sarkarnama

राजुरेश्‍वर, भाडंगानाथ बाबांचा आशिर्वाद घेत नारायण कुचेंचा प्रचार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

बदनापूर : राजूरचा गणपती आणि मतदारसंघातील भाडंगनाथ बाबांचे आशिर्वाद घेत भाजप आमदार नारायण कुचे यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. गावोगावी, वाड्या, वस्त्या, तांड्यांना भेटी घेत कुचे मतदारांशी संपर्क साधून पाच वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती मतदारांना देत आहेत. भाजपने कुचे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देत त्यांनी केलेल्या कामांची पावती दिल्याची चर्चा आहे. 

बदनापूर : राजूरचा गणपती आणि मतदारसंघातील भाडंगनाथ बाबांचे आशिर्वाद घेत भाजप आमदार नारायण कुचे यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. गावोगावी, वाड्या, वस्त्या, तांड्यांना भेटी घेत कुचे मतदारांशी संपर्क साधून पाच वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती मतदारांना देत आहेत. भाजपने कुचे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देत त्यांनी केलेल्या कामांची पावती दिल्याची चर्चा आहे. 

औरंगाबाद महापालिकेत नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती म्हणून काम केलेले नारायण कुचे यांचे नशिब गेल्या विधानसभा निवडणुकीत खुलले. शिवसेना-भाजपची युती तुटली आणि ऐनवेळी उमेदवारांचा शोध घेतांना सगळ्याच राजकीय पक्षांची तारांबळ उडाली. खासदार रावसाहेब दानवे यांनी बदनापूर या राखीव मतदारसंघातून नारायण कुचे यांना उमेदवारी जाहीर केली आणि पहिल्याच निवडणुकीत नारायण कुचे चोवीस हजार मतांची आघाडी घेत निवडून आले. 

नशिबाने दिलेल्या या संधीचे सोने करत नारायण कुचे यांनी पक्षाला 2019 मध्ये देखील आपल्याच नावाचा विचार करायला भाग पाडले. कुचे यांना पक्षाने पुन्हा संधी दिली, योगायोगाने यावेळी राज्यात शिवसेना-भाजप युती असल्याने कुचे पुन्हा आमदार होणार का? याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. शिवसेनेकडे असलेला बदनापूर मतदारसंघ गेल्या निवडणुकीत भाजपने जिंकल्यामुळे यावेळी तो कायम राहिला. त्यामुळे काही प्रमाणात शिवसेनेत नाराजी पसरली, बंडखोरी झाली पण या सगळ्यांना आपल्या बाजूने वळवण्यात कुचे यांना यश आल्याचे दिसते. निवडणुक प्रचारात युतीचे सगळेच पदाधिकारी एकत्रित प्रचार करत असल्याने हे स्पष्ट होते. 

राष्ट्रवादीशी थेट लढत.. 
नारायण कुचे यांची थेट लढत राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे रुपकुमार उर्फ बबलू चौधरी या गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्ध्याशीच होत आहे. वंचित आघाडी देखील मैदानात असली तरी बदनापूरात दुरंगीच लढत होईल असे बोलले जाते. सातत्याने मतदारांशी संपर्क ठेवून असलेल्या कुचे यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामे केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातोय. यात प्रामुख्याने गेल्या 30 वर्षापासून अंबड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळा उभारण्याचा प्रश्‍न आमदार कुचे यांनी मार्गी लावल्याचे सांगितले जाते. या शिवाय बहुतांश गांवात समाज मंदिरासाठी निधी, ग्रामीण भागातील रस्ते आणि विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्याचे सांगत नारायण कुचे मतदारांना समोरे जात आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख