घेतला वसा सोडणार नाही, उतणार - मातणार नाही - नारायण कुचे

घेतला वसा सोडणार नाही, उतणार - मातणार नाही - नारायण कुचे

बदनापूर : गेल्या निवडणूकीत मला उमेदवारी जाहीर झाली, ज्या लोकांनी माझा कधी चेहराही पाहिला नव्हता त्यांनी मला पंधरा दिवसांत आमदार केले. त्यामुळे उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही' अशी ग्वाही बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी रामकथेच्या समारोप प्रसंगी मतदारांना दिली. गेल्या सात दिवासांपासून कुचे यांच्या वतीने शहरात रामायणाचार्य रामराव ढोक महाराजांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. 

आगामी निवडणुका लक्षात घेता सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन सुरू आहे. बदनापूरचे आमदार नारायण कूचे यांनी देखील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीनिमित्त बदनापूर येथे रामकथेचे आयोजन केले होते. नारायण कुचे स्वःत दररोज रामकथेला हजेरी लावायचे. आज रामकथेच्या समारोप प्रसंगी कुचे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. " उतणार नाही, मातनार नाही, घेतला वसा टाकणार नाही ' असा विश्‍वास देतांनाच आगामी निवडणुकीत देखील मतदारांचा कौल आपल्यालाच मिळावा असा प्रयत्न त्यांनी रामकथेच्या माध्यमातून केल्याची चर्चा आहे. 

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये ऐनवेळी शिवसेना-भाजप युती तुटली आणि ती नारायण कुचे यांच्या पथ्यावर पडली. औरंगाबाद महापालिकेत नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती म्हणून काम केल्यानंतर अनपेक्षितपणे कुचे यांच्या गळ्यात बदनापूर विधानसभेची उमेदवारी पडली. मोदी लाटेत पहिल्याच प्रयत्नात त्यांना विधानसभेत पोचण्याची संधीही मिळाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे कट्टर समर्थक अशी कुचे यांची ओळख आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पुन्हा कुचे यांनाच उमेदवारी देणार असे खुद्द दानवे यांनीच जाहीर कार्यक्रमातून सांगितले आहे. त्यामुळे कुचे यांनी जोरदार तयारी सुरू केली. रामकथेचे आयोजन हा देखील त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जाते. 

त्यामुळे रामकथेच्या समारोप प्रसंगी कुचे यांनी भावनिक भाषण केले. ते म्हणाले की, आपला धर्म, संस्कृती टिकली पाहिजे या हेतूनेच अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतोय. वारकऱ्यांमुळेच आपला हिंदू धर्म टिकून आहे. त्यामुळेच मला वारकरी संप्रदायाबद्दल आदर आहे, आणि म्हणून एक कर्तव्य समजून हा सोहळा आयोजित केला. खासदार रावसाहेब दानवे यांच्या आशिर्वादाने मला 2014 मध्ये बदनापूर विधानसभेची उमेदवारी मिळाली. इथे समोर बसलेल्या जनतेने माझा चेहराही न बघता अवघ्या 15 दिवसांत मला आमदार केले. माझी सामान्य लोकांशी नाळ जुळलेली असल्यामुळे मी कधीही उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com