नंदुरबार जिल्हा - दिग्गजांच्या पक्षांतरामुळे लढती होणार प्रेक्षणीय

बालेकिल्ल्यातच कॉंग्रेसला संपवण्याचा भाजपचा निर्धार आहे. दिग्गजांचे त्यासाठी पक्षांतर होतंय. त्यामुळे येथील लढती लक्षणीय ठरतील.
नंदुरबार जिल्हा - दिग्गजांच्या पक्षांतरामुळे लढती होणार प्रेक्षणीय

नंदुरबार जिल्ह्यात विधानसभेच्या चार जागा असून, दोन भाजप आणि दोन कॉंग्रेसकडे आहेत. चारही मतदारसंघ राखीव असल्याने सर्वसाधारण गटातील नेते पालिका आणि जिल्हा परिषद एवढेच मर्यादीत राहतात, त्यामुळे राजकीय समझोत्यावरच येथील राजकारण चालते. कॉंग्रेसचे माजी मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत आणि सहकारमहर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे पुत्र दीपक यांच्या लवकरच होणाऱ्या भाजप प्रवेशाने अनुक्रमे नवापूर आणि शहाद्यातील भाजपची ताकद वाढेल, असे वाटते. 

अक्राणीचे आमदार अॅड. के. सी. पाडवी आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपण कोणत्याही स्थितीत भाजपमध्ये जाणार नसल्याचे सांगत चर्चेला पूर्णविराम दिलाय. असे असले तरी जिल्हा कॉंग्रेसमुक्त करण्यासाठी भाजपने जोरदार व्यूहरचना केली आहे. अक्राणीची जागा शिवसेनेला सुटल्यास बंडखोरीची शक्‍यता आहे. दुसरीकडे नवापूरला कॉंग्रेस आणि भाजप असा सरळ सामना होतो की, माजी आमदार शरद गावित पुन्हा रिंगणात उतरतात, हे पाहावे लागेल. 

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतर अंतर्गत मतभेद पाहता पक्षाने भाजप ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्याकडे पक्षाची जिल्ह्याची धुरा सोपविली. त्यांनी पक्षातील गटतट मिटवत सर्वांना बरोबर घेत कॉंग्रेसमुक्त जिल्ह्याचा निर्धार केलाय. सदस्य नोंदणीवर भर दिलाय. शहाद्यात दीपक पाटील यांच्या प्रवेशानंतर भाजपमध्ये जुने नवे वाद उफाळून गटबाजीचा धोकाही वाढणार आहे. भरत गावित यांच्या भाजप प्रवेशाने नवापूरमध्ये कॉंग्रेसमधील नाईक आणि गावित गट स्वतंत्ररीत्या रिंगणात असेल. 

नंदुरबारमधून डॉ. विजयकुमार गावित कोणत्याही पक्षात गेले तरी निवडून येतात. त्यांचे स्वतःचे वलय, नेटवर्क आणि मानणारा वर्ग आहे. चंद्रकांत रघुवंशी कॉंग्रेससाठी शर्थीचे प्रयत्न करतात, मात्र, त्यांना नगरपालिकेत भरपूर यश येऊनही विधानसभेत ते येत नसल्याने, पालिका आमची आणि आमदारकी तुमची, असा गुप्त समझोता असल्याचे उघड बोलले जाते. 

यंदा विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष नवापूरकडे असेल. कॉंग्रेसचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत वारसा बाजूला ठेवून भाजपमध्ये जाणार आहेत. त्यामुळे आमदार सुरूपसिंग नाईक यांचे पुत्र शिरीषकुमार कॉंग्रेसचे उमेदवार असतील. दुसरीकडे डॉ. गावित यांचे बंधू शरद हेही रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. त्याचा फायदा कॉंग्रेसला की भाजपला हे आज सांगणे कठीण आहे. भाजपला ही जागा जिंकायची असेल तर शरद यांची डॉ. गावितांना मनधरणी करावी लागेल. 

शहादा - तळोद्यातून गेल्यावेळेला तळोद्याचे भाजपचे उदेसिंग पाडवी हे अल्पमताने निवडून आले होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढविल्याचा त्यांना फायदा झाला होता. कॉंग्रेसचे पद्माकर वळवी अवघ्या आठशे मतांनी पराभूत झाले होते. राजेंद्रकुमार गावित राष्ट्रवादीतर्फे लढले होते. येथे भाजपने अधिक लक्ष देत गुजर समाजाचे नेते दीपक पाटील यांना भाजपमध्ये घेण्याचे ठरवलंय. त्यांच्यासह भरत गावित यांचा प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महानजनादेश यात्रेवेळी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने जागावाटपात तडजोड न केल्यास 2014 च्या निकालाचीच पुनरावृत्ती होईल. 

अक्कलकुवा आणि अक्राणी तालुका मिळून असलेल्या अक्राणी मतदारसंघात कॉंग्रेसचे ऍड. के. सी. पाडवी सातत्याने निवडून आलेत. आताही तेच कॉंग्रेसचे उमेदवार असतील. येथे शिवसेना हक्क सांगणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास भाजपमध्ये बंडखोरी किंवा भाजपपुरस्कृत अपक्ष अशी लढत असेल. भाजपचे प्रदेश सदस्य आणि पुलोद सरकारमधील माजी वनमंत्री (कै.) दिलवरसिंग पाडवी यांचे पुत्र नागेश यांनीही तयारी चालवली आहे. ही जागा भाजपला सुटल्यास शिवसेनेचे काय करायचे, हा प्रश्न असेल. प्रसंगी चौरंगी लढतही होऊ शकते. 

भाजप गतिमान, कॉंग्रेस डळमळीत
संपूर्ण खानदेशाची सुत्रे ताब्यात ठेवणारा कॉंग्रेसचा बालेकिल्ला नंदुरबार जिल्ह्यात सहा महिन्यांत कॉंग्रेसमध्ये मोठी पडझड झाली. दोन दिग्गजांनी भाजपची वाट निवडली. त्यांच्याबरोबरच मोठा गोतावळाही भाजपमय होणार असल्याने भाजपची बाजू मजबूत आहे. दुसरीकडे कॉंग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर आहेत. किंबहुना नेते हाच आमचा पक्ष असे सोयीच वक्तव्यही केले जातंय. या साऱ्यामुळे बालेकिल्ल्यातील कॉंग्रेसला खूपच डागडुजी करावी लागणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com