झाडे वाचवतांना बाळासाहेब व गोपीनाथरावांच्या स्मारकासाठी एकच न्याय - नंदकुमार घोडेले

झाडे वाचवतांना बाळासाहेब व गोपीनाथरावांच्या स्मारकासाठी एकच न्याय - नंदकुमार घोडेले

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांचा विषय राज्यभर गाजत आहे. त्यामुळे शिवसेनेने बाळासाहेबांचे स्मारक उभारतांना एकही झाड तोडणार नाही अशी भूमिका जाहीर केली. आता तोच न्याय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या शहरातील स्मारकासाठी देखील लावला जाईल असे स्पष्ट केले आहे. मेट्रो कारशेड उभारणीसाठी भाजप सरकारने मुंबईच्या आरे कॉलनीतील हजारो झाडांची कत्तल केली. शिवसेनेचा देखील झाडे तोडण्यास विरोध होता. राज्यात महाआघाडीचे सरकार येऊन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होताच त्यांनी पहिला निर्णय मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा घेतला होता. 

त्यांच्या या निर्णयाचे स्वागत देखील झाले. औरंगाबादेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. तेव्हा देखील एकही झाड तोडू नका असे आदेश मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या महापौरांना नुकतेच दिले होते. दरम्यान, औरंगाबाद महापालिकेच्या सत्तेतून भाजपने बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानूसार आज भाजपच्या उपमहापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा महापौरांकडे सोपवून शिवसेना विरोधाची धार अधिकच तेज केली. 

शिवसेना-भाजपकडून आता कुरघोडीचे राजकारण सुरू झाले असून शिवसेनेकडून भाजपच्या प्रत्येक प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्मारकांची उभारणी करतांना झाडे वाचवण्यासाठी " जो न्याय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी असेल तोच गोपीनाथ मुंडेच्या स्मारकाला' अशी भूमिका शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतली आहे. 

अमृता फडणवीसांच्या ट्‌वीटनंतर शिवसेनेची भूमिका 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक सिडको भागातील प्रियदर्शिनी उद्यानात उभारले जाणार आहे. त्यासाठी 65 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शासनाकडून यातील पाच कोटी रुपायंचा निधी शासानाने दिला आहे; मात्र स्मारकासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांवरून स्मारक वादात सापडले आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी ट्विट करून औरंगाबादेत बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शेकडो झाडे तोडली जात आहेत. ठाकरे सरकार ढोंगी असल्याची टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेने एकही झाड न तोडता बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दुधडेअरीच्या जागेत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या उभारल्या जाणाऱ्या स्मारकासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांचा विषय समोर आला. गोपीनाथराव मुंडे स्मारकात 110 झाडे बाधित होत आहेत. ती तोडण्यासाठी सिडको प्रशासनाने महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे परवानगी मागितली आहे. यासंदर्भात महापौर घोडेले यांच्याकडे विचारणा केली असता बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जो न्याय तोच न्याय गोपीनाथरावांच्या स्मारकासाठी असेल असे स्पष्ट केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com