Nanded's Ashokrao run on time will open Kedarnath's closet in Uttarakhand to Akshay tritiya | Sarkarnama

नांदेडचे अशोकराव वेळीच धावल्याने उत्तराखंडमधील केदारनाथाचे कपाट अक्षयतृतीयेला उघडेल! 

अभय कुळकजाईकर
गुरुवार, 16 एप्रिल 2020

आपल्याला वेळेत केदारनाथला पोचता येईल असा त्यांचा अंदाज होता. पण लॉकडाऊनची मुदत ३ मेपर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे चिंतेत असललेल्या महास्वामींनी अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपले केदारनाथला जाणे किती महत्वाचे आहे हे सांगितले.

नांदेड - बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या उत्तराखंडमधील श्रीक्षेत्र केदारनाथ येथील जगद्‍गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्यात येते. परंतु केदारनाथचे जगद्‍गुरु लॉकडाऊनमुळे नांदेड येथे अडकून पडले आहेत. केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्याची महास्वामींची तळमळ, पंरपरा आणि धार्मिक महत्व लक्षात घेता राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेतला.

बुधवारी श्री केदार जगद्‍गुरु यांना उत्तराखंड राज्यात केदारनाथला जाण्याची परवानगी राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली. अशोक चव्हाण यांनी परवानगीचे पत्र महास्वामीजींकडे सुपूर्द केले. त्यामुळे आता त्यांचा केदारनाथला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

श्री केदारनाथ मंदिराचे दरवर्षी दिवाळीला कपाट बंद केले जाते, त्यानंतर अक्षयतृतीयेला मंदिराचे कपाट उघडण्यात येते. हे दोन्ही धार्मिक विधी श्री केदारजगद्‍गुरु यांच्या हस्तेच होत असतात. दिवाळीला कपाट बंद झाल्यानंतर श्री केदारनाथ यांच्या डोक्यावर असणारा सोन्याचा मुकूट श्री केदार जगद्‍गुरु यांच्याकडे सहा महिने असतो.

अक्षयतृतीयेला कपाट उघडल्यानंतर हा मुकूट पुन्हा एकदा श्री केदारनाथांच्या मुर्तीवर विधीवत ठेवला जातो. यामुळे श्रीकेदार जगद्‍गुरु यांना अनन्यसाधारण महत्व आहे. मुळचे नांदेड जिल्ह्तील असलेले महास्वामी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडले.

१४ एप्रिल रोजी लॉकडाऊनची पहिली मुदत संपल्यामुळे आपल्याला वेळेत केदारनाथला पोचता येईल असा त्यांचा अंदाज होता. पण लॉकडाऊनची मुदत ३ मेपर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे चिंतेत असललेल्या महास्वामींनी अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपले केदारनाथला जाणे किती महत्वाचे आहे हे सांगितले. 

त्यानंतर अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली व महास्वामींना सुरक्षेचे सगळे उपाय करत प्रवास करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ होकार देत प्रवासाला परवनगी देत असल्याचे पत्र दिले. आता श्री केदार जगद्‍गुरु व त्यांच्या सोबत स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी हे मोटारीने केदारनाथला रवाना होणार आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख