nanded zp | Sarkarnama

नांदेड जिल्हा परिषदेच्या सत्तेची चावी "राष्ट्रवादी'च्या हाती

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 मार्च 2017

नांदेड ः नांदेड जिल्हा परिषदेची त्रिशंकू अवस्था असून एकीकडे कॉंग्रेस आणि दुसरीकडे भाजप व शिवसेना आहे. यामध्ये आता राष्ट्रवादीची भूमिका महत्वाची असून त्यांच्या हातात सत्तेची चावी आहे. राष्ट्रवादी ज्यांच्यासोबत जाणार त्यांना नांदेड जिल्हा परिषदेची सत्ता मिळणार आहे. 

नांदेड ः नांदेड जिल्हा परिषदेची त्रिशंकू अवस्था असून एकीकडे कॉंग्रेस आणि दुसरीकडे भाजप व शिवसेना आहे. यामध्ये आता राष्ट्रवादीची भूमिका महत्वाची असून त्यांच्या हातात सत्तेची चावी आहे. राष्ट्रवादी ज्यांच्यासोबत जाणार त्यांना नांदेड जिल्हा परिषदेची सत्ता मिळणार आहे. 

ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादीने गटनेत्याची निवड केली असून पक्षश्रेष्ठी ज्या प्रमाणे आदेश देतील त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 21 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दहा सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सर्वानुमते समाधान जाधव यांची निवड केल्याचे पत्र सादर केले.

राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्यांनी एकत्र येऊन पत्र दिल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सर्वजण एक असल्याचा संदेश देण्यात आल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीत राष्ट्रवादीला आणखी महत्व प्राप्त झाले आहे. 
जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दहा सदस्य निवडून आले. पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी नुकतीच बैठक झाली. जिल्हाध्यक्ष बापूसाहेब देशमुख गोरठेकर अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत सर्व सदस्यांनी विचार विनिमय करुन गटनेता म्हणून समाधान जाधव (वाई) यांची सर्वानुमते निवड केली. त्याबाबतचे अधिकृत पत्र गट नेत्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले.

या पत्रावर ललिता यल्लमगोंडे, संगीता जाधव, मधुमती देशमुख कुंटूरकर, दत्तू रेड्डी कप्पावार, विजय धोंडगे, संगीता मॅकलवाड, सुनयना जाधव, सुनंदा दहिफळे, मधुकर राठोड व समाधान जाधव या दहा सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

मागील वेळेस कॉंग्रेसने म्हणजेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांना बाजूला ठेऊन राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप नाईक (किनवट) आणि माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे (कंधार) यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेत आघाडी केली आणि सत्ता मिळविली होती. अध्यक्षपद कॉंग्रेसकडे ठेऊन उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि एका समितीचे सभापतीपद राष्ट्रवादीला देण्यात आले होते.

यंदाही अशीच खेळी करण्याचा अशोक चव्हाण यांचा मनसुबा आहे पण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी आम्ही दहाही सदस्य एकत्र आहोत आणि सर्वजण मिळून निर्णय घेऊ, असे अधिकृतरित्या जाहीर केल्यामुळे आता कॉंग्रेस कोणती भूमिका घेणार? हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. 

शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत यश मिळविले होते व अशोक चव्हाण यांना एकटे ठेवण्यात यशस्वी झाले होते. आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य एकत्र आले असून त्यांनी देखील राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अजून त्यांना यश आले नसले तरी राष्ट्रवादीने त्या बदल्यात युतीकडे अध्यक्षपद मागितले असल्याची जोरदार चर्चा आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख