`मैत्रिणी` पुन्हा स्पर्धेत उतरल्याने नंदाताई हैराण!

पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील तीन मैत्रिणी स्पर्धेत उतरल्या आहेत.
vaishali bankar, nanda lonkar, ashwini kadam
vaishali bankar, nanda lonkar, ashwini kadam

पुणे : पुणे महापालिकेतील सत्तेच्या काळात महापौरपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद हिसकावून घेतलेल्या माजी महापौर वैशाली बनकर, स्थायीच्या माजी अध्यक्ष अश्‍विनी कदम या दोघी पुन्हा त्यांच्याच पक्षाच्या नगरसेविका नंदा लोणकरांच्या वाटेत आल्या आहेत.

महापालिकेतील मानाचे विरोधीपक्ष नेतेपद खेचण्याची लोणकरांची इच्छा असतानाच बनकर, कदम यांनीही या पदावर दावा ठोकला आहे. हे पद महिलेच्या वाट्याला जाऊन त्यावर आपल्याच नावाला पसंती मिळण्याची लोणकरांची आशा वाढली असताना बनकर, कदम यांच्या दाव्याने त्या हैराण झाल्या आहेत. तरीही, "या दोघी चांगल्या मैत्रिणी असल्याने त्यांच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेत,' असे लोणकर सांगत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या खुर्च्चीत बसताना या दोघींपासून दगाफटका होणार नाही, इतका विश्‍वास लोणकरांना या घडीला आहे. मात्र, बनकर, कदम यांच्या मनात आपली मैत्रीण नंदाताईंबद्दल नेमके काय आहे ? हे तुर्तास तरी कळायला मार्ग नाही. 

महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी-कॉंग्रेसची सत्ता असताना पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद हे खुल्या गटासाठी आरक्षित होते. त्यामुळे या निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आलेल्या नंदा लोणकर महापौरपदाच्या शर्यतीत आल्या. या पदासाठी त्यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे कुणकूणही पसरली आणि लोणकर चर्चेत आल्या. पण आयत्यावेळी पहिल्यांदाच नगरसेविका झालेल्या बैशाली बनकरांना महापौरपदाचा मान मिळाला. बनकरांमुळे आपली संधी हुकल्याची सल आजही लोणकरांच्या मनात आहे. काही महिन्यांच्या नाराजीनंतर लोणकर पुन्हा आक्रमक झाल्या आणि 2015-16 मध्ये महापालिकेच्या तिजोरीच्या किल्ल्या अर्थात, स्थायीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी सरसावल्या. मात्र, 2012 च्या निवडणुकीत आपल्या "बंडखोर' स्वभावाप्रमाणे राष्ट्रवादीत बंड करीत अपक्ष नगरसेविका झालेल्या अश्‍विनी कदम यांनीही या पदासाठी नेतृत्वाकडे "हट्ट' धरला. आधीच महापौरपदाच्या हुलकावणीनंतर कशाबशा सावरलेल्या नंदा लोणकरांना पुन्हा राजकीय धक्का बसला.

अपक्ष नगरसेविका असूनही राष्ट्रवादीच्या कोट्यातील स्थायीचे अध्यक्षपद मिळवत कदम यांनी लोणकरांना रोखले. महापौर आणि स्थायीच्या अध्यक्षपद न मिळालेल्या लोणकर आता दुसऱ्यांदा नगरसेविका झाल्या. त्यातच विरोधी पक्षनेतेपदावर महिलेची निवड करण्याची भूमिका वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावरून या पदासाठी लोणकर आग्रही आहेत. आतापर्यंत कोणतेही पद न मिळाल्याने आता तरी ते मिळेल, अशी आशा त्यांना आहे. यापदासाठी मी एकमेव महिला इच्छुक असल्याचे त्या गुरुवारी सायंकाळीपर्यंत सांगत होत्या. मात्र, इच्छुकांच्या यादीत बनकर आणि कदम यांचेही अर्ज असल्याचे लोणकरांच्या कानावर आले. तेव्हा मात्र, त्या थोडाशा गोंधळल्या परंतु, बनकर, कदम यांचीही माझ्या नावाला पसंती असेल, हे सांगायलाही त्या गडबडीत विसरल्या नाहीत.

परिणामी, बनकर, कदम यांच्यापासून आपला राजकीय घात होण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या लोणकर या फेरीला मात्र; गाफील नाहीत, हेही खरे आहे. त्यामुळे या पदावरील नेत्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर बनकर, कदम या आपली मैत्रीण नंदाताईंचे अभिनंदन करणार की ? हे पद खेचून नंदाताईंची वाट रोखण्याची रोखण्याची हॅट्रीक साधणार ? हे राष्ट्रवादीचे अजितदादाच ठरवतील.

दक्षिण पुण्यात पक्षाची ताकद वाढविण्यासह पूरगस्तांना न्याय देण्यासाठी हे पद हवे असल्याचा दावा अश्‍विनी कदम करीत आहेत. तर "माझ्याही नावाचा विचार होईल,' असे वैशाली बनकर म्हणत आहेत. दुसरीकडे, नगरसेवक योगेश ससाणे, सचिन दोडके, महेंद्र पठारे आदींनी अर्ज केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com