नाणारचे समर्थन करणाऱ्या शिवसेना विभागप्रमुखाची उचलबांगडी 

नाणारचे समर्थन करणाऱ्या शिवसेना विभागप्रमुखाची उचलबांगडी 

मुंबई : कोकणातील प्रस्तावित नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असतानाच या प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या विभागप्रमुखाची उचलबांगडी करण्यात आली आहे. या संदर्भात शिवसेना भवनातून दुजोरा देण्यात आला. 

नाणारच्या संदर्भात शिवसेनेच्या मुखपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाली होती, त्यामुळे सत्तास्थापनेनंतर शिवसेनेची नाणार प्रकल्पाबाबतची भूमिका बदलली का, असा प्रश्न विचारत विरोधकांकडून शिवसेनेवर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनीदेखील नाणार प्रकल्पाला पाठिंब्याची भूमिका घेतल्याने चर्चेला उधाण आले. 

अखेर शिवसेनेने नाणार प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेच्या विभागप्रमुखाची पदावरून उचलबांगडी केली आहे. शिवसेनेने राजा काजवे यांना विभागप्रमुख पदावरून हटवत त्या जागी कमलाकर कदम यांची नियुक्ती केली आहे. राजा काजवे हे सागवे जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख होते, त्यांच्यावर कारवाईनंतर आता इतर समर्थकांवर काय कारवाई होणार,

 याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला पाठिंब्याची भूमिका घेणाऱ्या उर्वरित पदाधिकाऱ्यांबाबतचा अहवाल मागितला आहे. या अहवालानंतर इतर पदाधिकाऱ्यांवरदेखील कारवाई होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, नाणार प्रकल्पाचे गुणगान गाणारी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. 

यानंतर शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नाणारचे समर्थन करण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यात राजापूरमधील शिवसैनिकांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा दाखवण्यासाठी थेट सिंधुदुर्गात येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नाणारला पाठिंबा देणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. याप्रकरणी आता रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी सावध भूमिका घेतली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com