वंचितचे आव्हान : लोकसभेला तडाखा बसताच चंद्रपूरात श्‍यामकुळेंची घरशोध मोहीम

दलितबहुल या मतदारसंघात बहुजन वंचित आघाडीची भूमिका महत्त्वाची राहील. दलित समाजाची मते ऐरवी श्‍यामकुळेंच्या पारड्यात पडायची. आता वंचितमुळे त्यात विभाजनाची शक्‍यता आहे. हीच भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
shyamkule_nanaji
shyamkule_nanaji

चंद्रपूर : नागपूर निवासी नाना श्‍यामकुळे मागील दहा वर्षांपासून चंद्रपूरचे आमदार आहेत. याकाळात त्यांचे जनसंपर्क कार्यालय आणि निवासस्थान भाड्याच्या घरात राहीले. लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली आणि श्‍यामकुळेंना चंद्रपुरात हक्काच्या निवाऱ्याची उणीव भासायला लागली.

 त्यांची 'घर शोध' मोहीम बदललेल्या वाऱ्याची दिशा सांगत आहे, असे भाजपमधील त्यांच्या विरोधकांना वाटते. कॉंग्रेसला पंचवीस वर्षांनंतर या मतदारसंघात मोठी आघाडी मिळाली. मात्र, त्यांच्याकडे विधानसभेसाठी सक्षम उमदेवार नाही. उमदेवार आयात करण्याची तयारी आहे. त्याचवेळी बाहेरच्या उमदेवाराला अपशकुन घडविण्यासाठी कॉंग्रेसचा एक गट सज्ज झाला आहे. 

मतदारसंघांची 2009 मध्ये पुनर्रचना झाली. चंद्रपूर अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तत्पूर्वी सलग पंधरा वर्षे सुधीर मुनगंटीवार आमदार होते. भाजपमधील गटबाजीमुळे नागपूरच्या नाना श्‍यामकुळेंना येथून उमदेवारी दिली. निवडणुकीच्या पंधरा दिवस आधी येऊन ते विजयी झाले. चंद्रपूर मतदारसंघावरील मुनगंटीवार, अहीर यांचा प्रभाव, पक्ष संघटन, कार्यकर्त्यांची फळी आणि कॉंग्रेसच्या डागाळलेल्या उमदेवाराची श्‍यामकुळेंच्या विजयात महत्त्वाची भूमिका राहिली. 

 कॉंग्रेसने त्यांच्या विरोधात  2014 मध्ये महेश मेंढे या अपरिचित नेत्याला  उमदेवारी दिली . श्‍यामकुळे अपेक्षेप्रमाणे विजयी झाले. त्यावेळी भाजपकडून उमदेवारीसाठी इच्छुक किशोर जोरगेवार शिवसेनेकडून रिंगणात उतरले. त्यांनी पन्नास हजारांवर मते घेतली. मात्र, सलग दहा वर्षे आमदार असतानाही श्‍यामकुळे स्वत:चा प्रभाव निर्माण करून शकले नाही. अहीर आणि मुनगंटीवार यांचीच मतदारसंघावर आजवर छाप राहिली आहे.

 श्‍यामकुळेंनी या मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्‍नावर कधीच भूमिका घेतली नाही. आवठड्यातून पाच दिवस ते नागपुरातच असायचे. दलित समाजाचे पाठबळ हेच श्‍यामकुळेंचे भांडवल आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर चित्र पालटले. या मतदारसंघात पंचवीस वर्षांनंतर कॉंग्रेसला 25 हजार मतांची आघाडी मिळाली. कॉंग्रेसला मिळालेल्या आघाडीला श्‍यामकुळेंची निष्क्रियताही कारणीभूत ठरली, असा सूर आता भाजपच्या एका गोटात उमटत आहे. 

जिल्हा परिषदमधील भाजपचे समाजकल्याण सभापती बिरजू पाझारे यांना आता आमदारकीचे स्वप्न पडायला लागली आहेत. कॉंग्रेसमध्ये मताधिक्‍क्‍याच्या पार्श्‍वभूमीवर उमदेवारांची रीघ लागली आहे. सध्यातरी कॉंग्रेसकडे सक्षम उमदेवार नाही. पक्षसंघटन नावालाही अस्तित्वात नाही. छोट्या-मोठ्या अनेक गटात कॉंग्रेस विखुरली आहे.

 यापार्श्‍वभूमीवर किशोर जोरगेवार यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु, जोरगेवार यांच्या उमेदवारीला पक्षातील एका गटाचा विरोध आहे. "बौद्ध' समाजाचा उमदेवार हवा, अशी या गटाची मागणी आहे. दलितबहुल या मतदारसंघात बहुजन वंचित आघाडीची भूमिका महत्त्वाची राहील. दलित समाजाची मते ऐरवी श्‍यामकुळेंच्या पारड्यात पडायची. आता वंचितमुळे त्यात विभाजनाची शक्‍यता आहे. हीच भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com