nana patole interview social media | Sarkarnama

फडणवीस सरकार शिवसेनेच्या नव्हे तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर : नाना पटोले 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

पुणे : राज्यातील फडणवीस सरकार शिवसेनेच्या पाठिंब्यावर नव्हे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिवावर सत्तेवर आहे असा जोरदार हल्लाबोल करतानाच या सरकारच्या कामगिरीविषयीचे थर्मामीटर थोड्या दिवसांनी लावता येईल. देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहे. यापेक्षा दुर्दैव ते काय ? माझ्या शेतकऱ्याला निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांचे काय झाले असा रोखठोक सवाल भाजपचे खासदार नाना पटोले यांनी केला. 

पुणे : राज्यातील फडणवीस सरकार शिवसेनेच्या पाठिंब्यावर नव्हे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिवावर सत्तेवर आहे असा जोरदार हल्लाबोल करतानाच या सरकारच्या कामगिरीविषयीचे थर्मामीटर थोड्या दिवसांनी लावता येईल. देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहे. यापेक्षा दुर्दैव ते काय ? माझ्या शेतकऱ्याला निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांचे काय झाले असा रोखठोक सवाल भाजपचे खासदार नाना पटोले यांनी केला. 

गेल्या काही दिवसापासून भाजपला घरचा आहेर देणाऱ्या पटोले यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विशेषत: राज्यातील फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. मी पक्षाला काय दिले नाही असा सवाल करीत नाना म्हणाले, "" आज राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आहे. सत्तेवर येण्यापूर्वी शिवसेना विरोधीबाकावर बसली होती. पुढे ती सरकारमध्ये सहभागी झाली. फडणवीस सरकारचा कारभार शिवसेनेच्या पाठिंब्यावर सुरू असल्याचे चित्र असले तरी प्रत्यक्षात मात्र तसे नाही. हे सरकार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिवावर सुरू आहे. मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. मग, ते कोणाला रूचो वा ना रूचो. पक्षाला माझा स्पीडही माहित आहे. यापूर्वी मी कॉंग्रेसमध्ये होतो. मात्र, कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर असताना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर मी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यावेळीही मी परिणामाची चिंता केली नाही. आजही मी शेतकऱ्यांच्या मुद्यावर सरकारशी म्हणजेच आमच्या लोकांशी भांडत आहे. त्यात माझे चुकले काय ? ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला सत्तेवर आणले त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल ? माझी खुर्ची माझी नाही तर ती जनतेची आहे. मी जनतेसाठी लढाई लढत आहेत. मी कोणालाही घाबरत नाही आणि मी जे काही बोलतो त्याचा मला कधी पश्‍चातापही होत नाही. कारण मी माझ्यासाठी काहीच मागत नाही. शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे हीच माझी मागणी आहे. माझी जात आणि धर्मही शेतकरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कितीही मोठी किंमत मोजायला मी तयार आहे.'' 

चंद्रकांतदादा प्रथम मी विरोध केला 
कर्जमाफीप्रकरणी राज्यात दहा हजार बोगस शेतकरी असल्याचे वादग्रस्त विधान महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले होते त्यावेळी त्यांना विरोध करणारा पहिला माणूस मी होतो. याप्रकरणी विचारले की असे कसे काय बोलता ? त्यावेळी ते मला माझ्या बोलण्याच्या अर्थाचा अनर्थ केला त्यावर मी म्हणालो, की मग तुम्ही राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी मी बोलणारच असेही पटोले म्हणाले. 

राजू शेट्टी-बच्चू कडूंचे कौतुक 
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाविषयी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू या दोन्ही नेत्यांना शेतकऱ्यांविषयी कळवळा आहे. ते पोटतिटकीने शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडता आहेत. सरकारशी संघर्ष करीत आहेत त्यांचे कौतुक केले पाहिजे असे सांगून पटोले म्हणाले, की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हेच माझे लक्ष्य आहे. त्यांच्याविरोधात आजपर्यंत लढत आलो आणि लढतच राहणार. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मला भाजपत आणले. त्यांच्यामुळे मी पटेलांविरोधात लढलो. खरेतर त्यांनी मला सांगितले होते, की विधानसभा लढ. राज्यात मंत्री होता येईल. मी म्हटले पटेलच माझे टार्गेट आहे. त्यांना हरविण्यासाठीच मी लोकसभा लढणार आहे. पुढे तसेच झाले. मी त्यांना हरवूनच दिल्लीला गेलो. नाना पटोले यांनी आज एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्वपक्षावरच अधिक आगपाखड केली.  

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख