लोकांचा विरोध असेल तर सरकारने कायदा लादू नये - नाना पटोले

एखाद्या कायद्याला लोकांचा विरोध असेल; तर तो कायदा सरकारने लोकांवर लादू नये, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
nana patole felicitated in yavatmal
nana patole felicitated in yavatmal

यवतमाळ : एखाद्या कायद्याला लोकांचा विरोध असेल; तर तो कायदा सरकारने लोकांवर लादू नये, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. 

एनआरसीबाबत अप्रत्यक्षपणे त्यांनी मत व्यक्त केले. महीला असुरक्षित असणे ही बाब कोणत्याही सरकारसाठी भूषणावह नाही. राज्यात महिलांची सुरक्षा सर्वतोपरी असली पाहिजे. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. हिंगणघाट येथील तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेचा निषेध करीत महिलांसाठी सरकार कडक कायदे करणार असल्याचे संकेत पटोले यांनी दिले. येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

पटोले म्हणाले, सत्ता ही लोकांसाठी असली पाहिजे. जर एखाद्या कायद्याला लोकांचा विरोध असेल; तर तो कायदा सरकारने लोकांवर लादू नये, असे एनआरसीबाबत अप्रत्यक्ष मत पटोले यांनी व्यक्त केले. या देशात सर्वांनाच राहण्याचा अधिकार असल्याचे ते म्हणाले. 

याबाबत आपण पंतप्रधानांना पत्र पाठविले असून प्रत्यक्ष त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसींची जातीनिहाय जनगणना न झाल्यास लोकांनी बहिष्कार घालावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

डॉ. साळुंखे म्हणाले की, राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, ही बाब अभिनंदनीय असली; तरी कर्जमाफी हा शब्द न वापरता यापुढे तो कर्जमुक्ती वापरला पाहिजे. शेतकऱ्यांचेच सरकारवर भरपूर कर्ज असल्याने माफी कसली, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

विदर्भ किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी नाना पटोले यांच्या सत्कारामागील भूमिका व्यक्त केली. ते म्हणाले की, पटोले यांनी ओबीसी व शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य दखलपात्र आहे. भविष्यात शेतकऱ्यांना व ओबीसींना नाना पटोले हेच न्याय मिळवून देतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार ख्वाजा बेग यांनी सिंचन व बेरोजगारीचा प्रश्‍न उपस्थित करून शासनाने यावर उपाय करावेत, अशी भूमिका मांडली. अध्यक्षीय भाषणातून वामनराव कासावार यांनी पटोले यांच्या कार्याचा उल्लेख केला. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह शेतकरी बांधवांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

महाराष्ट्र प्रदेश किसान कॉंग्रेस, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समिती व ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आंदोलन फ्रंट यांच्या पुढाकारात येथील रंगोली ग्राऊंडवर काल दुपारी चार वाजता हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार होते. प्रमुख पाहुणे म्हणून विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार विजया धोटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, विनोद पटोले, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, नगरसेवक वैशाली सवाई, चेतना पवार, डॉ. दिलीप महाले, मिलिंद धुर्वे, राजेंद्र हेंडवे, डॉ. टी. सी. राठोड आदींची उपस्थिती होती.

विदर्भात पर्यटनाला वाव
विदर्भात अनेक मंदिरे आहेत. त्यामुळे पर्यटनाला वाव आहे. कळंब व माहूर येथे मी नुकताच जाऊन आलो. ही स्थळे विदर्भाशी निगडित असल्याने पर्यटनाला मोठा वाव आहे. यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा, असे मतही पटोले यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com