ईव्हीएमबाबत नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार; गडकरींच्या `ओएसडी`वर आरोप!

ईव्हीएमबाबत नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार; गडकरींच्या `ओएसडी`वर आरोप!

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिनमघ्ये फेरफार करण्यात आला असून निवडणुक अधिका-यांनीही पक्षपाती भूमिका घेतल्याची तक्रार कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्‍त यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या तक्ररीला राज्य निवडणुक कार्यालयातूनही दुजोरा देण्यात आला.

नागपूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांची भूमिका पक्षपातीपणाची होती, त्यांनी नियमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबवली नाही, असा थेट आरोप करणारी तक्रार कॉंग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केला आहे.

पटोलेंच्या तक्रारीनुसार, सुरुवातीच्या काळात स्ट्रॉंग रुममधील कॅमेरे तीन दिवसांपासून बंद होते. तक्रार केल्यावर कॅमेरे सुरू आहेत, फक्त मॉनिटर बंद असल्याचा दावा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करून या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. 20 मार्च 2019 ला उमेदवारांच्या प्रतिनिधीसाठी झालेल्या ईव्हीएम चाचणी दरम्यान तीन वेळा ही चाचणी प्रक्रिया बंद पडली. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या दुसऱ्या चाचणी दरम्यान संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया कोलमडली होती. केंद्रीय निरीक्षकही आश्‍चर्यचकित झाले होते. मात्र याबाबतही दखल घेण्यात आली नाही. 

भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष कार्यासीन अधिकारी (ओएसडी) सुधीर देऊळगावकर हे स्ट्रॉंग रुम उघडताना उपस्थित होते. तसेच ते पूर्णवेळ मतमोजणीस्थळी हजर होते. देऊळगावकर सरकारकडून वेतन घेत असताना त्यांना मतमोजणीस्थळाची प्रवेश पत्रिका देणे नियमबाह्य आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी पटोले यांनी केली. 

ईव्हीएम बॅटरीवर शंका 
मतमोजणीच्या वेळी कॉंग्रेस प्रतिनिधींनी अनेक वेळा तोंडी आणि लेखी तक्रारी केल्या. त्यात ईव्हीएमला सील नसणे, यंत्रात बॅटरी नसणे, मध्य नागपुरातील बुथ क्रमांक 166 च्या व्हीव्हीपॅट मशीनचे सील उपलब्ध नसणे आदींचा प्रामुख्याने समावेश होता. अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवूनही त्यांनी त्याची दखल न घेता मोजणी सुरूच ठेवली. विशेष म्हणजे, सर्व यंत्रांची बॅटरी 99 टक्के चार्ज असल्याचे दिसून आले, याकडे पटोले यांनी लक्ष वेधले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com