शेतकऱ्यांचा बुलंद आवाज नानाभाऊ ! 

जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार ते विधानसभा अध्यक्ष असा नाना पटोले म्हणजे नानाभाऊंचा प्रवास राहिला आहे. भाजपचे कडवे विरोधक म्हणून त्यांची ओळख असली तरी सभागृहात त्यांना सर्वांना बरोबर घेऊन चालावे लागेल. शेतकऱ्यांच्या नानाभाऊंवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.
शेतकऱ्यांचा बुलंद आवाज नानाभाऊ ! 

 नाना फाल्गुनराव पटोले हे नानाभाऊ नावाने विदर्भात ओळखले जातात. ते मुळ कॉंग्रेसचे. मात्र कॉंग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2014 मध्ये त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मोदी लाटेत त्यांनी राष्ट्रवादीचे वजनदार नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. त्यावेळी असे म्हटले जात होते की नानाभाऊ भाजपला मिळाल्याने ते कॉंग्रेस-राष्ट्रवादीची दाणादाण उडवतील. मात्र घडले भलतेच. 

त्यांचे मन काही भाजपत रमले नाही. मुळात बंडखोर असलेले नानाभाऊ यांनी थेट हेवीवेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले आणि राजीनामा दिला. तसे धाडस भल्या भल्यांना होत नाही पण, ते त्यांनी करून दाखविले. अन्याय, मान-अपमान सहन करणाऱ्यापैकी ते नक्कीच नाहीत.

अन्यथा गप्प राहुन भाजपची खासदारकी जपली आणि सत्तेची सोबत केली असती. शेतकरी आणि इतर मागास वर्गाच्या प्रश्‍नांसाठी ते पेटून उठतात. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवा. त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांविषयी सहानुभूती असणारे, पेटून उठणारे जे काही मोजके नेते आहेत त्यामध्ये नानाभाऊ, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांना समावेश करावा लागेल. शेतकरी या चार शब्दाबाबत ते कोणतीही तडजोड करीत नाही. 

अस्मानी आणि सुल्तानी संकटांचा सामना करणाऱ्या, गळ्याभोवती फास आवळणाऱ्या शेतकऱ्यांचे दु:ख यांना सहन होत नाही. सरकार कोणाचेही असो शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे हीच त्यांची भूमिका असते. नानाभाऊ हे ही शेती आणि शेतकऱ्यांसाठी कधी गप्प बसले नाहीत.

म्हणूनच की सत्ताधारी भाजपचे खासदार असूनही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मान ताठ केली. त्यांनी ताठ केलेली मान मोदींना आवडली नाही. शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा असे असा आग्रह धरणाऱ्या नानाभाऊंना भाजपमधून बाहेर पडावे लागले. मात्र स्वस्थ बसतील ते नानाभाऊ कसे. 

भाजपमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली. त्यांचा विश्वास निर्माण केला. इतकेच नव्हे तर मोदींच्या गुजरातमध्ये जाऊन त्यांनी भाजपपुढे आव्हान उभे केले. थोडे आमदार कमी पडले अन्यथा गुजरातमध्येही चमत्कार घडला असता. भाजपचे कडवे विरोधक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना पुन्हा तिकिट मिळाले नाही. गोंदीया-भंडारामधून पटेल यांनी आपला उमेदवार उभा केला. नानाभाऊ नाराज झाले नाहीत. त्यांनी एक पाऊल मागे घेतले. पुढे 2019 मध्ये थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात ते मैदानात उतरले. त्यांचा पराभव झाला. मात्र वातावरण निर्मिती करण्यात ते यशस्वी झाले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभात निवडणुकीत त्यांनी साकोली मतदारसंघातून ते विजयी झाले. 

2019 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशाच बदलली. भाजपबरोबर शिवसेनेने युती तोडली. ती "एनडीए'च्या बाहेर गेली. आज शिवसेना दोन कॉंग्रेसला बरोबर घेऊन सत्तेवर आली आहे. आघाडीचे सरकार आल्यानंतर जागा वाटपचा निर्णय झाला. त्यामध्ये विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेसकडे आले. खरे तर या पदासाठी कॉंग्रेसमध्ये रथीमहारथी होते. त्यापैकी काही जणांच्या नावाला राष्ट्रवादीतून विरोध होता. ज्येष्ठांना डावलून नानाभाऊंनीच विधानसभा अध्यक्ष व्हावे अशी मागणी झाली. आता ती पूर्ण झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदी त्यांनी बिनविरोध निवड झाली आहे. 

जिल्हा परिषद सदस्य, आमदार खासदार ते विधानसभा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिला आहे. विधानसभा अध्यक्ष तुलनेने ज्येष्ठ असतो. मात्र नानाभाऊंचे वय (57) पाहता त्यांना ही संधी लवकर मिळाली असे म्हणावे लागेल. सभागृहात भाजप विरोधीपक्ष म्हणून प्रबळ आहे. 105 आमदार आहेत.

अध्यक्ष झाल्यामुळे त्यांना सर्वांना बरोबर घेऊन चालावे लागेल. पक्षपात करून चालणार नाही हे खरे असले तरी अध्यक्ष हे सत्ताधाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात. नानाभाऊंवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. ही जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास त्यांच्या कॉंग्रेस आणि सर्वच पक्षांना म्हणूनच वाटतो.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com