सरकारच्या दबावात अधिकाऱ्यांनी केली जनतेच्या मतांची चोरी - नाना पटोले

लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार आहे. पण तो यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही पूर्ण ग्राऊंड तयार केले आहे, यावेळी "चोरांचा' निशाना साधणारच, असे नाना पटोले म्हणाले. पत्रकार परिषदेला माजी महापौर विकास ठाकरे, नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेद्र मुळक, नाना गावंडे, प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे,अभिजीत वंजारी हजर होते.
सरकारच्या दबावात अधिकाऱ्यांनी केली जनतेच्या मतांची चोरी - नाना पटोले

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरकारच्या दबावात लोकांनी दिलेल्या मतांची चोरी केल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे 
नागपूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नाना पटोले यांनी केला. रामटेक लोकसभा मतदार संघात समावेश असलेल्या उमरेड विधानसभा मतदार संघाची 
स्ट्रॉंगरुम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत होती. येथून डीव्हीआरची (डीजीटल व्हिडीओ रेकॉर्डींग) चोरी झाल्याचा आरोप रामटेकचे उमेदवार किशोर गजभिये यांनी केला. या संपूर्ण निवडणूक प्रक्रीयेत शासकीय अधिकारी महायुतीच्या उमेदवारांच्या हीतासाठी कसेकसे राबले, याचा पाढाच दोन्ही उमेवारांनी आज पत्रकार परिषदेत वाचला. 

11 एप्रिलला मतदान पार पडल्यानंतर उमरेड विधानसभा मतदार संघातील सर्व बुथच्या ईव्हीएम स्ट्रॉंगरुममध्ये आणण्यात आल्या. यावर डीजीटल व्हिडीओ 
कॅमेऱ्यांची निगराणी होती. 12 एप्रिलला सकाळी ईव्हीएम नागपुरच्या कळमना येथे आणण्यात आल्या. तेव्हा डीव्हीआर आणि ईतर काही साहित्य उमरेडलाच होते. 12 च्या रात्री डीव्हीआरची चोरी झाली. यावेळी तेथे एक पोलिस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, जमदार आणि शिपायांचा बंदोबस्त होता. तरीही डीव्हीआर आणि दोन एलईडी टीव्ही चोरीला गेले. पण या चोरीचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसल्याचे गजभियेंनी म्हटले आहे. 13 ला सकाळी हा प्रकार उघडकीस आला पण सहायक निवडणूक अधिकारी जगदीश लोंढे यांनी तक्रार केली नाही. आज 12 दिवस उलटूनही त्यांनी चोरीची तक्रार दिलेली नाही. त्यामुळे लोंढेंवरही कारवाई, करण्याची मागणी त्यांनी केली. त्या रात्री 
ईव्हीएममध्ये नेमकी काय गडबड केल्या गेली हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे या प्रकारातील सर्व दोषींवर कारवाई करावी. 12 च्या रात्रीचा डीव्हीआर आम्हाला बघायचा आहे. तो जर सापडला नाही, तर आम्ही मतमोजणी होऊ देणार नाही आणि पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करु, असे ते म्हणाले. 

रामटेक लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम नागपुरच्या कळमन्यात वेळेत पोचल्या. पण नागपूर शहरातील पेट्या शहरातल्या शहरात पोचायला 48 तास कसे लागले, असा 
प्रश्‍न नाना पटोले यांनी उपस्थित केला. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना डीव्हीआर बद्दल विचारले असता तो असल्याचे त्यांनी सांगितले. पण हीच बाब त्यांना जेव्हा न्यायालयात विचारण्यात आली तेव्हा त्यांना रेकॉर्ड नसल्याचे म्हटले. यावरुन अधिकारी कुणाच्या तरी ईशाऱ्यावर हे सर्व करीत असल्याचा संशय बळावतो, असे पटोले म्हणाले. आमच्या लोकांना यांनी मॉक पोल तपासू दिले नसल्याचेही ते म्हणाले. मतदारांना बिएलओच्या माध्यमातून पाच दिवस आधी परिचय पत्र पाठवायला पाहीजे. पण ते सुद्धा पाठविण्यात आले नाही. एकाच घरातील पाच मतदारांचे मतदान पाच वेगवेगळ्या बुथ वर कसे काय गेले, याही प्रश्‍नाचे उत्तर अद्याप मिळाले नसल्याचे ते म्हणाले. हा लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार आहे. पण तो यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही पूर्ण ग्राऊंड तयार केले आहे, यावेळी "चोरांचा' निशाना साधणारच, असे नाना पटोले म्हणाले. पत्रकार परिषदेला माजी महापौर विकास ठाकरे, नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेद्र मुळक, नाना गावंडे, प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, 
अभिजीत वंजारी हजर होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com