देशात हुकुमशाही आणण्याचे काम सुरु : नाना पटोले

 देशात हुकुमशाही आणण्याचे काम सुरु : नाना पटोले

नागपूर : या सरकारकडून देशाची घटनात्मक व्यवस्था संपविण्याचे काम सुरु आहे. न्याय व्यवस्था कोलमडली आहे, तेव्हाच न्यायाधीशांना मिडीयासमोर येऊन आपली कैफियत मांडावी लागली. देशात हुकुमशाही आणण्याचे काम सुरु असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. 

लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी आज सिव्हिल लाईन येथील प्रेस क्‍लबमध्ये घेतलेल्या पत्रकारपरिषदेतून प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल आदर असल्याचे सांगितले. मात्र, त्याचवेळी त्यांनी महापालिकेची स्वायतत्ता संपुष्टात आणल्याचा आरोप करीत गडकरी यांना लक्ष्यही केले. 

नागपुरात साठ हजार कोटींची कोणती कामे केली ? या कामामुळे नागपूरकरांवर किती कर्ज लादले ? याचा हिशेबही त्यांनी यावेळी मागितला. खैरलांजी प्रकरण विरोधक उकरून काढत असले तरी याप्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची स्पष्टोक्‍ती त्यांनी दिली. याबाबत विधानसभेतील भाषणाचे इतिवृत्त तपासून घ्यावे, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले. शहीदांच्या नावाने मतांचा जोगवा मागितला जात असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टिका केली. 

या देशाची संवैधानिक व्यवस्था संपविण्याचे स्वप्न शेजारी पाकिस्तान व चीन बघत आहे. तेच काम मोदी करीत असून ते पंतप्रधान व्हावे ही या दोन्ही देशांची इच्छा असल्याचे पटोले म्हणाले. ज्या चीनने अझर मसूदला दहशतवादी घोषित करण्यापासून वाचविले त्यांच्याच वस्तू विकण्याचा ठेका सरकारने घेतला, असा आरोपही त्यांनी केला. 

आतापर्यंत झालेल्या युद्धात जेवढे जवान शहीद झाले, त्यापेक्षा जास्त गेल्या पाच वर्षात शहीद झाले असून पंतप्रधान कसली सुरक्षा करतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मिहान पूर्णत्वास नेण्यास प्राधान्य देण्यात येईल. महापालिकेचे बळकटीकरण तसेच मेट्रोचे डिझाईनही जास्तीत जास्त लोकांना लाभ पोहोचेल, असे करण्यात येईल. मिहानमध्ये रामदेव बाबा यांना दिलेली जागेच्या संबंधित प्रक्रियेची तपासणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले. पत्रकारपरिषदेत शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, ऍड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, प्रशांत पवार, अतुल लोंढे उपस्थित होते. 
मोदी वाराणसीत लढतात, मी तर महाराष्ट्रातच - नाना पटोले 
गुजरातचे नरेंद्र मोदी वाराणसीतून लढतात, ते चालतं. मी तर महाराष्ट्रातच लढतो आहे. माझे घर, मतदान नागपुरात आहे. मुलेही येथेच शिकत आहेत, असे नमुद करीत माजी खासदार नाना पटोले यांनी बाहेरील उमेदवार असल्याचा कांगावा करणाऱ्यांना टोमणा हाणला. नागपूरचा विकास घोटाळ्याचा विकास असून येत्या काळात ते पुढे आणणार, असे स्पष्ट करीत त्यांनी निवडणुकीत आक्रमकतेचे संकेत दिले. 

प्रियांका गांधी पुढील महिन्यात नागपुरात 
4 किंवा 6 एप्रिलला नागपुरात प्रियांका गांधी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय अनेक दिग्गज नेते प्रचाराला येणार असून काही नेते स्वतःहून सरकारविरोधात सभा घेतील, असे नमुद करीत त्यांनी जोरदार लढतीचे संकेत दिले. कॉंग्रेसमध्ये गटबाजी असल्याचा विरोधकांकडून प्रचार करण्यात येत आहे. मात्र, येत्या काही दिवसांत त्यांच्यातील गट पुढे येईल, असेही ते म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com