नाना पाटेकर पुरग्रस्तांना देणार एक हजार पत्र्याची पाने 

नाना पाटेकर पुरग्रस्तांना देणार एक हजार पत्र्याची पाने 

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : आपत्ती आल्यानंतर आपण जात आणि धर्म विसरून मांडीला मांडी लावून बसून जेवतो. मग इतरवेळी आपण असे का करत नाही, असा प्रश्न उपस्थित करून पूरग्रस्त लोकांवर ओढवलेली ही परिस्थिती न सहन होणारी अशीच आहे.

ते सर्वजण आपल्याच घरचे आहेत, असे समजून प्रेमाने आपण प्रत्येकाने त्यांना सावरूया, असे भावनिक आवाहन जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी कराड तालुक्‍यातील एक हजार पूरग्रस्त घरांना पत्र्याची पाने देण्याचे आश्वासन दिले. 

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा पूर्ण केल्यानंतर नाना पुण्याकडे जात असताना त्यांनी रेठरे खुर्द (ता. कराड) गावास भेट दिली. तेथील बाबासाहेब आंबेडकर स्मारकमध्ये उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. 

सुरुवातीस श्री. पाटेकर यांनी आबासाहेव पवार यांच्याकडून रेठरेमधील पुरातील नुकसानीची माहिती घेतली. श्री. पवार यांनी रेठरेसह तालुक्‍यात एक हजार घरांना छप्पर घालण्यासाठी पत्र्याच्या पानांची गरज असल्याचे सांगितले. 

ग्रामस्थांशी संवाद साधताना नाना म्हणाले, मी घरांना पत्रे देतो म्हंटल्यानंतर टाळ्या वाजवण्याची गरज नाही. मी पण तुमच्यातील एक आहे. आजपर्यंत तिकीट काढून मला बघत होता. आज मी तुमच्यासमोर आलोय. तुम्ही आपत्ती आल्यानंतर सर्व जात-धर्म विसरून एकत्र जेवता. मग एरव्ही का जाती-जातीचा भेदभाव करता. आपत्तीवेळी मांडीला मांडी लावून जेवायचे सुचते. ते पुन्हा एरव्ही का सुचत नाही, असा सवाल करत त्यांनी जाती धर्मावरून तरुणांची डोकी भडकवणाऱ्यांना चांगलेच फटकारले. 

माझी जात तुम्हाला माहिती आहे का? असा प्रश्न उपस्थित करून नाना म्हणाले, माझ्या बहिणीने मुस्लिम मुलाशी लग्न केले. मी तिथं जातीचा विचार केला नाही. मला दुःखदेखील झाले नाही. उलट माझ्या घरात अब्बास आला, हे महत्वाचे वाटले. काही लोकांना मुस्लिम माणसाने तयार केलेली बिस्किटे आवडतात, अशी पण काही उदाहरणे आहेत. असा भेदभाव नाहीसा करण्याचा दाखला त्यांनी यावेळी दिला. 

ते म्हणाले, आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी शासनाला पण मर्यादा आहेत. मला काहीतरी चांगले करता येईल, म्हणून मी इथंपर्यंत आलो. आपण सर्वजण चांगले काहीतरी करूया. त्यासाठी प्रत्येकवेळी रक्ताचे नाते असावे, असे काहीच नाही.

मानवतेच्या नात्याने आपत्तीकडे व नंतरच्या आयुष्याकडे पाहूया. पुन्हा हे आयुष्य परत मिळणार नाही. मिळालेल्या आयुष्याचा चांगल्यासाठी उपयोग करूया. मी तुम्हाला मदत करून काही उपकार करत नाही. अशी वेळ कुणावर येऊ नये, आपण जात धर्म बाजूला ठेवून मानवतेच्या भावनेने एक राहूया अशी भावनिक सादही त्यांनी यावेळी ग्रामस्थांना घातली. 

यावेळी निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंद्रजीत देशमुख, कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, सरपंच मधुकर इटांबे, उपसरपंच चंद्रकांत पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. एम. करचे, गावकामगार तलाठी श्री. कणसे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

होतकरू विक्रमचे कौतुक...... 

यावेळी नानांचे स्वीय सहायक गणेश थोरात यांनी रेठरे गावातील युवक विक्रम पाटील यांनी आपल्या बेताच्या परिस्थितीतही पूरग्रस्त कुटुंबांना 15 हजार रुपयांची संसारपयोगी भांडी दिल्याचे सांगताच श्री. पाटेकर यांनी विक्रमला जवळ घेत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. घरची परिस्थिती नसताना विक्रम हे करू शकतो, मग आपणही याकामी मागे का. मानवता हा एकच धर्म मानुया असेही ते म्हणाले. मी पुन्हा येईन, असे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com