namita munda get masters degree | Sarkarnama

विधानसभेच्या तयारीवेळीच नमीता मुंदडांची पॅरिसच्या विद्यापीठातून मास्टर्स डिग्री

प्रशांत बर्दापूरकर
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

वास्तू विशारदमध्ये पदवी परीक्षेत गोल्ड मेडॅलिस्ट असलेल्या नमिता मुंदडा यांनी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करतानाच पॅरिस येथील विद्यापीठातून वास्तू विशारद अभ्यासक्रमाची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्यासह भारतातील फक्त दोन विद्यार्थ्यांनी ही डिग्री मिळवली आहे. 

अंबाजोगाई (जि. बीड) : दिवंगत लोकनेत्या माजी आरोग्यमंत्री डॉ. विमलताई मुंदडा यांची सून नमिता अक्षय मुंदडा यांनी पॅरिस येथील विद्यापीठातून वास्तू विशारद (आर्किटेक्‍ट) अभ्यासक्रमाची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी मतदार संघात विधानसभेची तयारी करतानाच ही पदवी प्राप्त केली आहे. पॅरिस येथील विद्यापीठातून "मास्टर्स इन इंजिनिअरींग ऍन्ड आर्किटेक्‍चर ' या अभ्यासक्रमासाठी जगभरातून 35 तर देशातील दोन विद्यार्थ्यांमध्ये नमिता मुंदडा पात्र ठरल्या होत्या. 

एकिकडे विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी मतदार संघात तयारी करतानाच महिन्यातील सात दिवस विद्यापीठात बंधनकार असलेली हजेरी पूर्ण करणे असे दुहेरी कसरत त्यांनी पेलली आहे. मुंबईच्या कमला रहेजा अभियांत्रिकी महाविद्यालयातून वास्तू विशारद (आर्किटेक्‍ट) पदवीत त्या गोल्ड मेडॅलिस्ट आहेत. सध्या त्या मोठमोठ्या बांधकाम प्रकल्पांचे डिझाईन तयार करतात. 

नमिता मुंदडा यांनी डिझाईनचे केलेल्या कामाचे "इनसाईड आउटसाईड' या स्थापत्य क्षेत्रातील नामांकित जुन्या राष्ट्रीय मासिकाने कौतुकही केलेले आहे. पदवी मिळविण्यासाठी पॅरिस विद्यापीठात महिन्यातले किमान सात दिवस हजेरी आणि आणि इकडे मतदार संघातील कायम जनसंपर्क तुटू न देण्याची किमया त्यांनी पार पाडली आहे. यामुळे आता त्यांच्या नावापुढे "मास्टर्स इन इंजिनिअरींग ऍन्ड आर्किटेक्‍चर' ही पदवी तर लागली आहे. आता राजकीय प्रयत्नातून "आमदार'कीची संधी मिळेल का, याकडे अनेकांचे लक्ष आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख