Najib Mulaa challenges his mentor Jitendra Awhaad | Sarkarnama

जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात  नजीब मुल्ला यांचे शक्तीप्रदर्शन

राजेश मोरे  
बुधवार, 23 जानेवारी 2019

वरिष्ठ नेत्यांना वाटत असेल तर मी आमदारही होईन

काही कार्यकर्त्यांमध्ये काही नाराजी होती. त्याच्यामध्ये काही प्रमाणात निराशा आली होती. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जल्लोष निर्माण करण्यासाठी येथे आलो आहे. त्या कार्यकर्त्यांना वाटत होते की आपण पक्षाच्या कारभारात मागे पडत आहोत. पण ते सोबत असल्याचा संदेश दिला. आमदारकीबाबत मी विचार केलेला नाही. राष्ट्रवादी काॅग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत असेल तर मी आमदारही होईन. पण आता महापालिकेच्या नगरसेवकपदापासून पुढे जाण्याची इच्छा आहे हे निश्चित.

-नजीब मुल्ला

ठाणे :  राष्ठ्रवादी काॅग्रेसचे कळवा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि नगरसेवक नजीब मुल्ला या गुरुशिष्यातील राजकीय दुरावा आता लपून राहिलेला नाही. अशा वातावरणात नजीब मुल्ला यांनी थेट मुंब्रा  येथे जाऊन आपला वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केल्याने राजकीय जाणकरांच्या भूवया उंचावल्या आहेत. एखाद्या नेत्याच्या थाटात यावेळी मुल्ला यांचा वाढदिवस रविवारी साजरा करण्यात आला.

राबोडी येथे राहणारे नजीब मुल्ला याच प्रभागातून निवडून येत आहेत. पण त्याचवेळी मुस्लीम बहुल मंुब्रा कैासा विभागात त्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग आहे. महापालिकेतील कारभारावरुन आव्हाड यांच्याबरोबर दुरावा झालेले मुल्ला सध्या त्यांच्यापासून दूर राहत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

अशावेळी थेट त्यांच्या मतदारसंघात जाऊन सुमारे तीस ठिकाणी बाईक रॅलीसह केक कापत मुल्ला यांनी वाढदिवस साजरा केला आहे. गेल्या दहा वर्षात येथे वाढदिवस कधीही साजरा न करणाऱया मुल्ला यांनी अचानक येऊन येथे वाढदिवस साजरा केल्याने या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला मानणारा एक वर्ग या परिसरात असल्याचा संदेश देण्यासाठीच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.

आव्हाड यांचे खंदे समर्थक समजले जाणारे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी काही दिवसापूर्वी स्थायी समितीचा राजीनामा देऊन सर्वप्रथम जोरदार राजकीय भूकंप आणला होता. मात्र त्याचा फायदा न घेता शिवसेनेने हा राजीनामा फेटाळून राजकीय मुत्सद्दीपणा दाखविला होता.

मुल्ला हे आमदार आव्हाडांवर का नाराज असल्याचे गुपित आता गुपित राहिलेले नाही. गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यामध्ये नियमित संवाद नसल्याचे कळते. यापूर्वी ठाण्यात राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये दिवगंत वसंत डावखरे आणि जितेंद्र आव्हाड असे दोन गट असल्याचे पहावयास मिळत होते.

 डावखरे यांच्या निधनानंतर शहरातील गटतट संपल्याचे मानले जात होते. पण मुल्ला यांच्या या नव्या भूमिकेमूळेच लवकरच ठाण्यात मुल्ला गट उदयाला येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यांना वर्तकनगर लोकमान्यनगर परिसरातील काही नाराजांचा पाठींबा मिळण्याची शक्यता आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेना आणि भाजपाला जोरदार टक्कर देणाऱया मुल्ला यांना आमदारकीचे वेध लागले आहेत. अशावेळी पक्षाने संधी दिल्यास विधानसभेची निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे.

पण कोणत्या विधानसभेतून लढण्यास तयार आहेत, याची थेट माहिती देण्यास त्यांच्याकडून टाळले जात आहे. अशावेळी त्यांनी शेकडोच्या संख्येने बाईक रॅली काढून मंुब्रा परिसरात रॅली काढून वाढदिवस साजरा केल्याने त्यांना हाच मतदारसंघ हवाहवासा वाटू लागल्याची चर्चा आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख