देवळालीत भाजप- शिवसेना युती मोडावी म्हणून भाजप इच्छुकांचे देव पाण्यात 

तीस वर्षांपासून शिवसेनेचे माजी मंत्री बबन घोलप यांच्या कुटुंबीयांचा आमदार देवळाली मतदारसंघात आहे. यंदाही त्यांची जोरात तयारी आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोर्चेबांधणी केली आहे. मात्र शिवसेना- भाजप युती तुटावी ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची नव्हे तर भाजपच्याच नेत्यांची मनापसून इच्छा आहे. त्यासाठी अनेक इच्छुक रोज नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. भाजपच्या या इच्छुकांनी शिवसेनेचे आमदार योगेश घोलप यांच्या विरोधात निवडणुकीसाठी अक्षरशः देव पाण्यात ठेवले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ चर्चेत आला आहे.
देवळालीत भाजप- शिवसेना युती मोडावी म्हणून भाजप इच्छुकांचे देव पाण्यात 

नाशिक : तीस वर्षांपासून शिवसेनेचे माजी मंत्री बबन घोलप यांच्या कुटुंबीयांचा आमदार देवळाली मतदारसंघात आहे. यंदाही त्यांची जोरात तयारी आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोर्चेबांधणी केली आहे. मात्र शिवसेना- भाजप युती तुटावी ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची नव्हे तर भाजपच्याच नेत्यांची मनापसून इच्छा आहे. त्यासाठी अनेक इच्छुक रोज नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. भाजपच्या या इच्छुकांनी शिवसेनेचे आमदार योगेश घोलप यांच्या विरोधात निवडणुकीसाठी अक्षरशः देव पाण्यात ठेवले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. 

देवळात आमदार घोलप, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे दोघेही शिवसेनेचे आहेत. या मतदारसंघात सहा विधानसभा निवडणूकांत शिवसेनेचे घोलप विजयी झाले आहे. त्यामुळे यंदा त्यांच्याविरोधात अँटीइनकमबन्सी आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस कष्ट घेत आहे. मात्र भाजपच्या इच्छुकांनाही घुमारे फुटले आहेत. 

सामान्यतः शिवसेना, भाजपची युती तुटावी ही दोन्ही कॉंग्रेसची मनोमन इच्छा होती. मात्र लोकसभेला ही युती अधिक घट्ट झाली. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसची निराशा झाली. देवळाली मतदारसंघात मात्र युती झाल्याने भाजपचे नेतेच प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी युती तुटावी यासाठी जंग जंग पछाडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेचा लाभ घेण्यासाठी भाजपकडून नगरसेविका सरोज आहिरे, देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड सदस्या प्रीतम आढाव, माजी नगरसेवक रामदास सदाफुले यांसह चार ते पाच इच्छुक आहेत. 

युतीमुळे या सगळ्यांची गैरसोय झाली आहे. त्यापैकी सरोज आहिरे यांनी मात्र यापूर्वीच युतीपेक्षा उमेदवारी महत्त्वाची असल्याचे संकेत देत, बंडाचा इशारा दिला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या (ए) इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते युतीसोबत राहणार की, वंचित आघाडीसोबत? हा कळीचा मुद्दा ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे शिवसेनेकडून योगेश घोलप, तर भाजपकडून नाव चर्चेत राहावे म्हणून अनेकांची दावेदारी सुरू आहे. 

पश्‍चिम पट्ट्यावर राष्ट्रवादी 
देवळाली मतदारसंघात जिल्हा परिषदेचे चारपैकी दोन गट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. गोवर्धन-गिरणारे परिसरात जिल्हा परिषद गटासह अनेक गावांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रभाव आहे. पूर्वेकडील भागात मात्र राष्ट्रवादीला मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दोन वर्षांपासून माजी नगरसेवक लक्ष्मण मंडाले नियोजनपूर्वक प्रयत्न केले आहेत. त्यांनी सबंध मतदारसंघात संपर्क व कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम जोमात सुरु ठेवले आहे. या शिवाय सुनील कोथमिरे, दीपक वाघ, रविकिरण घोलप आदी पाच जणांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे. पश्‍चिम भागात गोवर्धन, गिरणारे अनेक गावांत राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर, सभापती रत्नाकर चुंबळे आदींच्या माध्यमातून ताकद असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पूर्वेकडील भागात मात्र नेटवर्क कमी आहे. या उलट शिवसेनेकडे खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री बबनराव घोलप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर आदींच्या माध्यमातून जिल्हा परिषद एक गट, पालिका आणि महापालिकेच्या काही प्रभागांत शिवसेनेची ताकद आहे. 

वंचित- मनसे प्रभावी घटक 
लोकसभा निवडणुकीत देवळाली राखीव मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची ताकद स्पष्ट झाल्याने वंचित आघाडीच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. लोकसभेचे उमेदवार पवन पवार पुन्हा देवळालीतून प्रयत्नशील आहेत. या शिवाय डॉ. संजय जाधव, गौतम वाघ, बाळासाहेब गांगुर्डेही इच्छुक आहेत. देवळालीत राज ठाकरे यांना मानणारे युवा कार्यकर्तेही आहेत. शिवसेनेच्या पक्षांतर्गत शह-काटशहाच्या राजकारणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम मनसेचे देवळालीतील महत्त्व अधोरेखित करते. मनसेकडून भूमिका जाहीर नाही. मनसे स्वतंत्रपणे लढल्यास तो घटक महत्त्वाचा ठरेल. प्रमुख इच्छुक व रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांतील इच्छुकांच्या बंडखोरीचा मतविभागणीवर प्रभाव राहील. 

विधानसभा निवडणूक 2014 
योगेश बबनराव घोलप (शिवसेना) 49751 
रामदास दयाराम सदाफुले (भाजप) 21580 
नितीन मोहीते (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 18402 
प्रताप मेहेरोलिया (मनसे) 15001 
गणेश उन्हवणे (कॉंग्रेस) 9115 

लोकसभा निवडणूक 2019 देवळाली बलाबल 
हेमंत गोडसे (शिवसेना-भाजप) 80688 
समीर भुजबळ (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 38755 
पवन पवार (वंचित आघाडी ) 24459 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com