लाल बावट्याच्या जिल्ह्याचे भगवेकरण कधी झाले? : शरद पवार  - nagr sharad pawar on bjp | Politics Marathi News - Sarkarnama

लाल बावट्याच्या जिल्ह्याचे भगवेकरण कधी झाले? : शरद पवार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 जानेवारी 2018

सांगोल्याचे मतदार, माझ्यावर प्रेम केलेल्यांचा तो बहुमान! 
सत्काराला उत्तर देताना गणपतराव देशमुख म्हणाले, "हा पुरस्कार माझा व्यक्तिगत नसून सांगोल्याचे मतदार, कार्यकर्ते व माझ्यावर प्रेम केलेल्यांचा तो बहुमान आहे.''  

नगर : नगर जिल्हा एकेकाळी लाल बावट्याच्या चळवळीचा जिल्हा होता. जिल्ह्यात त्यांची सेना प्रचंड वाढली होती. या जिल्ह्यात भाजप कसा आला? आणि जिल्ह्याचे भगवेकरण झालेच कसे?, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी उपस्थित केला. 

सात्रळ येथे झालेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यसेनानी पी. बी. कडू पाटील स्मृती समाजक्रांती पुरस्कार आमदार गणपतराव देशमुख यांना पवार यांच्या हस्ते देण्यात आला. 

आमदार गणपतराव देशमुख यांचा गौरव करताना शरद पवार म्हणाले, ""राजकीय जीवनात व्यक्तिगत स्वार्थाचा विचार न करता समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचाच प्रयत्न देशमुख यांनी केला. त्यांना समाजातील शेवटच्या घटकाचे प्रश्न मांडण्यातच रस आहे. सामान्यांसाठी आयुष्य वेचलेल्या गणपतरावांचे स्थान आजही राज्यात उच्च आहे. त्यांचा सत्कार पी. बी. कडू पाटील यांच्या कार्याला साजेसाच झाला आहे. कडू पाटील यांनी सहकारी कारखानदारीतील अनिष्ट प्रवृत्तींविरुद्ध लढा उभारून जिल्ह्यातील सहकारी चळवळीला नवी दिशा दिली. सामान्य माणसाच्या परिवर्तनासाठी व रयत शिक्षण संस्थेशी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. "रयत'च्या इतिहासात कडू पाटलांचे नाव कायमचे कोरले आहे. त्यांच्या नावाने गणपतराव देशमुखांना दिलेला पुरस्कार भूषणावह आहे.'' 

मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पुरस्काराचे वितरण रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष जयश्री चौगुले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप वळसे पाटील होते. या वेळी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, आमदार अरुण जगताप, बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, शिवाजी कर्डिले, चंद्रशेखर घुले, दादा कळमकर, प्रसाद तनपुरे, अण्णासाहेब म्हस्के, रावसाहेब म्हस्के, पांडुरंग अभंग, चंद्रशेखर कदम, डॉ. अशोक विखे पाटील, दुर्गा तांबे, मीनाताई जगधने, ममता पिपाडा, पुष्पा काळे, अविनाश आदिक, नरेंद्र घुले, सीताराम गायकर आदी उपस्थित होते. 

पी. बी. कडू पाटील सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. अशोक गोसावी व मंगेश कडलग यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप शिंदे यांनी आभार मानले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख