नासुप्र बरखास्तीबाबतचा निर्णय मागे घेणे म्हणजे नागपूरकरांवर अन्याय… - withdrawal decision of nit is an injustice to nagpurins | Politics Marathi News - Sarkarnama

नासुप्र बरखास्तीबाबतचा निर्णय मागे घेणे म्हणजे नागपूरकरांवर अन्याय…

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

या सरकारने लक्षात ठेवावे की, आम्ही एकही वीज जोडणी कापू देणार नाही. या बेईमान सरकारच्या विरोधात आज आम्ही टाळे ठोको आंदोलन केले. ही बेईमानी पुढेही सुरू राहिली, तर आमचे कार्यकर्ते प्रत्येक घरासमोर उभे राहतील.

नागपूर : नासुप्र (नागपूर सुधार प्रन्यास) बरखास्त करण्याच्या संदर्भात २७ डिसेंबर २०१६ आणि १३ ऑगस्ट २०१९ रोजी मंत्रिमंडळाने निर्णय घेतले होते. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय मागे घेण्याला मान्यता देण्यात आली आहे. हे निर्णय मागे घेणे म्हणजे नागपूरच्या जनतेवर प्रचंड अन्याय होणार असल्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आज येथे म्हणाले. 

बावनकुळे म्हणाले, नासुप्र बरखास्त करण्याचा निर्णय मागे घेण्यामागे काहीतरी मोठे गौडबंगाल आहे. कुणाच्यातरी राजकीय फायद्यासाठी हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. अनेकांचे हित यामागे जोपासले चालले आहे. यामध्ये नागपूरकरांवर प्रचंड अन्याय होणार आहे. महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास या दोन्ही संस्था एका ठिकाणी ठेवणे म्हणजे जनतेला पुन्हा हेलपाटे मारावे लागणार आहेत. काही नेत्यांकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. या नेत्यांना आपले भूखंड नासुप्र करून विकसीत करून घ्यायचे आहे. अशांसाठीच सरकारने हा निर्णय घेतला आहे. केवळ मूठभर लोकांना लाभान्वित करण्यासाठी हे सरकार संपूर्ण नागपूरकरांवर अन्याय करत आहे. 

कोरोना काळातील वीज बिल माफ करावे आणि १०० युनिट वीज मोफत द्यावी, या मागणीसाठी भाजपने आज राज्यभर आंदोलन  केले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात कोराडी येथील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोका आणि हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे माध्यम प्रतिनिधींसोबत बोलत होते. महावितरणतर्फे ग्रामपंचायतींना पत्र पाठविण्यात आले आहे. जो कुणी वीज बिल वसूल करून आणेल, त्याला १० टक्के कमिशन दिले जाईल, असे या पत्रात म्हटले आहे. अशा या कमिशनखोर सरकारच्या विरोधात राज्यभरातील जनता रस्त्यावर आलेली आहे. अशा सरकारचा आम्ही धिक्कार करतो, असे बावनकुळे म्हणाले. 

या सरकारने लक्षात ठेवावे की, आम्ही एकही वीज जोडणी कापू देणार नाही. या बेईमान सरकारच्या विरोधात आज आम्ही टाळे ठोको आंदोलन केले. ही बेईमानी पुढेही सुरू राहिली, तर आमचे कार्यकर्ते प्रत्येक घरासमोर उभे राहतील आणि वीज जोडणी कापायला आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विरोध करती, असा इशारा बावनकुळेंनी दिला. या सरकारला जनतेशी काही देणेघेणे नाही, असे यांच्या एकंदर वागणुकीवरून दिसतेय. मागच्या अधिवेशनात या सरकारने घोषणा केली होती की, १०० युनिट मोफत वीज देऊ. ही घोषणा फक्त लोकप्रियतेसाठी होती. त्यांच्या घोषणेप्रमाणे आज त्यांनी जनतेला १२०० युनिट वीज मोफत दिली पाहिजे. आमच्या सरकारच्या काळात आम्ही ४५ लाख शेतकऱ्यांना ५ वर्ष वीज दिली आणि एकही पैसा घेतला नाही. आजही ते शक्य आहे, पण या सरकारची नियत नाही, अशा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख