ॲम्बुलन्स आणि परवानगी असलेली सरकारी वाहने पंचर होणार नाही का ? - will not ambulance and government vehicles be punctured | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

ॲम्बुलन्स आणि परवानगी असलेली सरकारी वाहने पंचर होणार नाही का ?

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

टायर पंचर दुकाने खुली ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी सुधारित आदेश काढला. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता टायर पंचर दुकानदारांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी यावेळी केले.

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर बुलडाणा जिल्हा प्रशासनाने शहरात लॉकडाऊन केले. यामध्ये दूध व्यावसायिक प्रभावित झाले होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी प्रशासनाशी चर्चा करून त्यांना दिलासा दिला. त्यानंतर टायर पंचर दुकानदारांचाही व्यवसाय जिल्हा प्रशासनाच्या निर्णयामुळे ठप्प झाला होता. तेव्हा लॉकडाऊनच्या काळात ॲम्बुलन्स आणि परवानगी असलेली सरकारी वाहने पंचर होणार नाही का, असा सवाल करीत तुपकरांनी पंचरवाल्यांनाही न्याय मिळवून दिला. 

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे गेले वर्ष सर्वांसाठीच खराब गेले. त्यानंतर प्रत्येक सावरण्याच्या प्रयत्नांत असतानाच यावर्षी कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. अशात जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या प्रश्‍नाबाबत तुपकरांनी जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करून त्यांना दिलासा मिळवून दिला. त्यानंतर पंचरवाल्यांसमोर पोटापाण्याचा प्रश्‍न उभा राहिला. यातून रविकांत तुपकर मार्ग काढू शकतात, असा विश्‍वास त्यांना होता. त्यामुळे त्यांनी तुपकरांची भेट घेतली.  त्यांनीही लगेच त्यांच्या प्रश्‍नाची सोडवणूक केली. लॉकडाऊनच्या काळात पंचर दुकानदारांची कशी गरज आहे, हे त्यांनी जिल्हा प्रशासनाला पटवून दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही त्यांचे म्हणणे पटले आणि त्यांनी पंचरची दुकाने सुरू ठेवण्याबाबतचा सुधारित आदेश काढला. 

कोरोनामुळे पंचर दुकानदारांच्या पोटावर लाथ बसत असल्याने तसेच अँब्युलन्स व परवानगी असलेल्या वाहनांचे पंचर काढण्यासाठी पंचर दुकाने नियमित सुरू ठेवण्याची परवानगी देऊन दिलासा द्यावा, याकरिता रविकांत तुपकर काल प्रशासनाशी भांडले. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती व अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते यांची भेट घेतल्यानंतर समस्या दूर करण्याची मागणी केली. नियम पाळण्याच्या अटीवर परवानगी देत सायंकाळी वेळेचा सुधारित आदेश काढण्यात आला. त्यामुळे प्रमुख प्रश्न मार्गी लागला.

हे सुद्धा वाचा : कोरोना नसतांनाही खासगी लॅबकडून पॉझिटिव्ह अहवाल !

शहरातील टायर पंचर दुकानवाल्यांना लॉकडाऊनमुळे अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. आपल्याला रविकांत तुपकरच न्याय मिळवून देऊ शकतील, या पक्क्या विश्वासाने त्यांनी तुपकर यांची भेट घेतली. यावेळी सर्वांच्या समस्या ऐकल्यानंतर रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कोरोनासंदर्भातील नियम पाळण्याच्या अटीवर परवानगी दिली. टायर पंचर दुकाने खुली ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी सुधारित आदेश काढला. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता टायर पंचर दुकानदारांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी यावेळी केले. याप्रसंगी स्वाभिमानीचे राणा चंदन, पवन देशमुख, शे. रफिक शे. करीम, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, आकाश माळोदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख