हेच अश्रू अडवाणी, जोशी आणि गडकरींसाठी का नाही ओघळले ? - why these tears did not flow for adwani joshi and gadkari asked nana patole | Politics Marathi News - Sarkarnama

हेच अश्रू अडवाणी, जोशी आणि गडकरींसाठी का नाही ओघळले ?

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

मोदींच्या नौटंकीला देशातील जनता आता भुलणार नाही. दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईने जनतेचे डोळे उघडले आहेत. मोदी शेतकऱ्यांच्या भल्याच्या बाता करतात, पण मोदी सरकारच्या कार्यप्रणालीवरून असे वाटते की, देशात फक्त अदानी आणि अंबानी हेच शेतकरी आहेत.

नागपूर : खासदार गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी समाप्त झाला. त्यावेळी त्यांनी निरोप देताना राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. त्यांचे अश्रू साऱ्या देशाने बघितले. मग हेच अश्रू लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि नितीन गडकरींसाठी का नाही ओघळले, असा प्रश्‍न कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे ‘मीट द प्रेस’मध्ये केला. खरं तर मोदींना नटसम्राट हा किताब दिला पाहिजे, अशी कोटी त्यांनी केली. 

यावेळी प्रेस क्लबमध्ये त्यांच्यासोबत आमदार अभिजित वंजारी, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, आमदार विकास ठाकरे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी मंत्री आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार होते. नाना म्हणाले, हे अश्रू ढाळणे वगैरे सर्व नौटंकी आहे. २०१४ मध्ये जेव्हा पहिल्यांदा मोदींचे सरकार आले. तेव्हा त्यांनी आधी सभागृहाच्या पायऱ्यांवर डोकं टेकवलं त्यानंतर प्रवेश केला. तेव्हा सेंट्रल हॉलमध्ये मी होतो. तेथे एका बाजूला अडवाणी बसले होते. तेव्हा मोदी का नाही झाले भावूक? २६ जानेवारीला जगाच्या पोशिंद्याचे आंदोलन चिरडण्यात कुठलीही कसर ठेवली नाही. आंदोलनादरम्यान किती जणांचे प्राण गेले, तेव्हा मोदी का नाही झाले भावूक? शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडल्यानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत खऱ्या अर्थाने भावूक झाले होते. त्यांचे अश्रू खरे होते. मोदींच्या नौटंकीला देशातील जनता आता भुलणार नाही. दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईने जनतेचे डोळे उघडले आहेत. मोदी शेतकऱ्यांच्या भल्याच्या बाता करतात, पण मोदी सरकारच्या कार्यप्रणालीवरून असे वाटते की, देशात फक्त अदानी आणि अंबानी हेच शेतकरी आहेत बाकी कुणी नाही, अशी तोफ त्यांनी डागली. 

त्यांच्या चुका जनतेसमोर आणणार 
देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या चुका केल्या, त्या आता आम्ही जनतेसमोर आणणार आहोत. देशात मोदी आणि राज्यात फडणवीस सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला. यांची एकाधिकारशाही, मोगलाई जनतेने बघितली. आता त्यांचा हिशेब होणारच आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेस चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. क्रमांक १ वर आणण्यासाठी आम्हाला जास्त वेळ लागणार नाही. आज राज्यभरात कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये नवी ऊर्जा संचारली आहे. पक्षश्रेष्ठींनी राज्याला नवी टीम दिली आहे. अजूनही राज्याच्या संघटनेमध्ये काही नवे चेहरे येतील. आमचे कार्यकर्ते जनतेमध्ये पोहोचतील आणि लवकरच कॉंग्रेसला राज्यात नंबर १ क्रमांक मिळवून देतील. 

स्वातंत्र्यांनंतर देशातील पहिले मोठे आंदोलन
केंद्र सरकारने केलेले तीन काळे कायदे रद्द करावे, यासाठी देशातील शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमांवर थंडीची परवा न करता बसला आहे. हे देशातील सर्वात मोठे आंदोलन आहे. किंबहुना स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे हे मोठे आंदोलन आहे. आता उभा महाराष्ट्र आंदोलक शेतकऱ्यांसोबत उभा राहणार आहे. या कायद्यांमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंची साठेबाजी कशी करता येईल, याची तरतूद केंद्र सरकारने केली आहे. ती कुणासाठी केली, हे आता जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही. जनता सर्व समजून चुकली आहे. तीन काळे कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय शेतकरी दिल्लीच्या सीमेवरून आता हटणार नाहीत, असा इशाराही त्यांनी केंद्र सरकारला दिला. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख