आता आणखी काय-काय विकणार आहात : आमदार प्रतिभा धानोरकर - what else are you going to sell now said mla pratibha dhanorkar | Politics Marathi News - Sarkarnama

आता आणखी काय-काय विकणार आहात : आमदार प्रतिभा धानोरकर

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

गृहिणी अत्यंत विश्‍वासाने आपल्या बजेट मधून पै.. पै.. जमा करून एलआयसीमध्ये गुंतवणूक करीत असतात. परंतु एलआयसीसुद्धा विकण्याच्या निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. महिला अर्थमंत्री असून सीतारमण यांनी या निर्णयाने महिलांना धक्का दिला आहे.

चंद्रपूर : एअर इंडिया, एलआयसी विकण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. सरकारी जमिनी विकणार, बीपीसीएल पण  विकणार, हे सरकारी मालमत्ता विकणारे मोदी सरकार ठरणार आहे. आता आणखी काय विकायचे शिल्लक आहे, असा प्रश्‍न विचारत आज केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. 
 
गृहिणी अत्यंत विश्‍वासाने आपल्या बजेट मधून पै.. पै.. जमा करून एलआयसीमध्ये गुंतवणूक करीत असतात. परंतु एलआयसीसुद्धा विकण्याच्या निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. महिला अर्थमंत्री असून सीतारमण यांनी या निर्णयाने महिलांना धक्का दिला आहे. कोरोनामुळे देशात हजारो युवकांचे रोजगार गेले. बेरोजगारांना रोजगार देण्याचे मोदी सरकारने जाहीर केले होते. रोजगार निर्मितीसाठी या बजेटमध्ये खास काहीच नसल्याचे दिसून येत आहे. आत्मनिर्भर भारत करणारे मोदी सरकार मात्र महिलांना या अर्थसंकल्पात काही देऊ शकले नाही. त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी काहीच योजना नसल्याचे आमदार धानोरकर म्हणाल्या. 

आज मोदी सरकारने अर्थसंकल्पात केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू राज्यांतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून निवडणुकीच्या तोंडावर लॉलीपॉप दिला आहे. इतर राज्याच्या तुलनेत या चारही राज्यासाठी 2.27 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्याच्या तुलनेत महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. देशाला अन्नसुरक्षा देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भरीव काही तरतूद करण्यात आली नाही. कोरोनामुळे देशात हजारो रोजगार गेले, रोजगार निर्मितीसाठी या बजेटमध्ये काहीच नाही. मध्यमवर्गीयांसाठी आयकरात सूट अपेक्षित होती. त्यामध्ये काही दिलासा दिलेला नाही. एअर इंडिया, एलआयसीला विकण्याचा निर्णय ह्या मोदी सरकारने घेतला आहे. सरकारी जमिनी विकणार, बीपीसीएल पण सरकार विकणार असून हे सरकार सरकारी मालमत्ता विकणारे सरकार ठरणार आहे. 

आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी आणि शेती या घटकाला केंद्रस्थानी ठेवण्यात आलेले नाही. महिला सबलीकरण याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. सामान्य माणसावर अन्याय करण्यात आला आहे. ‘अच्छे दिन’चा लॉलीपॉप देऊन हे सरकार दोनदा सत्तेत आले. आधीच पेट्रोल आणि इतर इंधनाचे दर मात्र शंभरी पार करत आहेत. त्यात या बजेटमध्ये डिझेलवर ४ रुपये व पेट्रोलवर २.५० रुपये कृषीकर लावण्यात आला आहे. जीएसटीमधील कमतरता दूर करण्याचे केवळ आश्‍वासन दिले जात आहे. त्यामुळे देशातील व्यापारी वर्ग मोदी सरकारवर संतापलेला असल्याचे आमदार धानोरकर म्हणाल्या. 
 Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख