यवतमाळ : राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान राज्यभरात काल (31 जानेवारी) बालकांना पोलिओ लस देण्यात आली. मात्र, यवतमाळमध्ये १२ बालकांना पोलिओ लस म्हणून सॅनिटायझर पाजण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्व बालकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
पोलिओ लसीकरणादम्यान १२ बालकांना पोलिओ डोस समजून चक्क सॅनिटायझर पाजण्यात आल्याची घटना घाटंजी तालुक्यातील कापसी (कोपरी) येथे काल घडली. लस दिल्यानंतर या सर्व बालकांची प्रकृती बिघडली. यामुळे आरोग्य यंत्रणांची धावाधाव सुरू झाली. या बालकांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी आज रुग्णालयाला भेट देऊन या बालकांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, परिस्थितीचा आढावा घेऊन आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम काल झाली. घाटंजी तालुक्यातील कापसी (कोपरी) येथे १२ बालकांना पोलिओचा डोस पाजण्याऐवजी चक्क सॅनिटायझर पाजण्यात आले. ही सर्व बालके १ ते ५ या वयोगटातील आहेत. मुलांना उलट्यांचा त्रास झाल्याने पालकांच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे काल रात्रीच १२ बालकांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की, पोलिओ लस समजून मुलांना सॅनिटाझर पाजण्यात आल्याचे आरोग्य केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी काही वेळाने सर्व मुलांना पोलिओची लस दिली. घटना घडल्यानंतर उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आलेली नव्हती. मुलांना लस दिली त्यावेळी लसीकरण केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका असे तिघे हजर होते. तिघांपैकी कुणाकडून ही चूक झाली याचा तपास सुरू आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.