आतापर्यंत आपलेच मतदारसंघ बांधले, आता ‘मोठा भाऊ’ होण्यासाठी धडपड...

पश्चिम महाराष्ट्रवादी पार्टी म्हणून राष्ट्रवादीला संबोधले जाते. विदर्भाच्या अनुशेषाला राष्ट्रवादी कारणीभूत आहे, विदर्भाचा निधी पश्चिम महाराष्ट्रात पळविला जातो, असा आरोप राष्ट्रवादीवर आहे. विरोधकांनाही मतदारांवर तसे बिंबवण्यात यश आले आहे.
NCP
NCP

नागपूर : राष्ट्रवादीची ताकद पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मर्यादित आहे. आमदारांची संख्याही जवळपास निश्चितच आहे. विस्तारासाठी विदर्भात मोठी संधी आहे. मात्र स्थानिक नेते फारसे मनावर घेत नसल्याचे श्रेष्ठींना आढळले. तशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. दुसरा उमेदवार निवडून आला तर आपल्या मंत्रिपदाचे काय? या भीतीने राष्ट्रवादीचे अनेक नेते आपला मतदारसंघच कसा शाबूत राहील, यावरच सर्व शक्ती आजवर खर्ची घालत होते. आता त्यांनाच कामाला लावण्यात आले असल्याचे समजते. आता ‘मोठा भाऊ’ होण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड सुरू झाली आहे.

मागे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ‘आता आम्ही मोठे भाऊ आहोत’, असे वक्तव्य करीत नागपुरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात का वाढत नाही, याचा शोध घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील उद्यापासून विदर्भातून दौऱ्याला प्रारंभ करणार आहेत. प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी घेऊन ते संवादाचे सिंचन करणार आहेत. विदर्भात जोर मारल्याशिवाय ‘मोठा भाऊ‘ होता येणार नाही, याची जाणीव झाल्याने राष्ट्रवादीचा आता सर्व फोकस विदर्भावर राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला दीड दशक लोटले आहे. शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग विदर्भात आहे. यानंतरही आमदारांची संख्या वाढत नाही. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बोटावर मोजण्याइतके उमेदवार निवडून येतात. तब्बल पंधरा वर्षे आघाडीची सत्ता होती. महत्त्वाची खातीही काही नेत्यांना सोपवण्यात आली होती. मात्र नेत्यांचा मतदारसंघ सोडता पक्षाचा विस्तार झालेले नाही. उलट पक्ष वाढण्याऐवजी अधिकच कमजोर झाल्याचे दिसून आले आहे. ही बाब राष्ट्रवादीने चांगलीच मनावर घेतली आहे. आता त्यांनी स्थानिक नेत्यांनाच कामाला लावले आहे. एवढेच नव्हे तर जबाबदारीसुद्धा निश्चित केली आहे. याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विदर्भातून दौऱ्याला प्रारंभ करून सर्वांना संदेशही दिला आहे.

गैरसमज दूर करणार
पश्चिम महाराष्ट्रवादी पार्टी म्हणून राष्ट्रवादीला संबोधले जाते. विदर्भाच्या अनुशेषाला राष्ट्रवादी कारणीभूत आहे, विदर्भाचा निधी पश्चिम महाराष्ट्रात पळविला जातो, असा आरोप राष्ट्रवादीवर आहे. विरोधकांनाही मतदारांवर तसे बिंबवण्यात यश आले आहे. त्यामुळे विदर्भात भाजप चांगलीच फोफावली आहे. मतदारांमधील भ्रम दूर करून आमचे विदर्भावर लक्ष आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जात आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com