राज्य सरकारने इंधनावरील कर कमी करावे : चंद्रशेखर बावनकुळे - state government should reduce fuel tax said chandrashekhar bawankule | Politics Marathi News - Sarkarnama

राज्य सरकारने इंधनावरील कर कमी करावे : चंद्रशेखर बावनकुळे

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

इंधन दरवाढीच्या प्रश्‍नावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना विनंती करतो की, त्यांनी सरकारला सूचना द्यावी, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी आणि पेट्रोल, डिझेलवर राज्य सरकारने जो ३८ रुपये कर लावला आहे, तो कमी करावा.

नागपूर : पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष ओरडत आहेत. आंदोलने केली जात आहेत. इंधन दरवाढीसाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार आपले पाप झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्य सरकारने इंधनावरील कर कमी केल्यास किमती कमी होतील, असे राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आज येथे म्हणाले. 

राज्य सरकारने मोगलशाहीचं धोरण स्वीकारलं आहे. आता सरकार ४५ लाख शेतकरी आणि जवळपास २० लाख घरगुती वापराचे वीज जोडण्या कापणार आहे. एकूण ७५ लाख वीज जोडण्या कापण्याचा घाट सरकारने घातला आहे. यामुळे चार कोटी लोक प्रभावित होणार आहेत. आमच्या सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात एकाही शेतकऱ्याची वीज कापली नाही. एकाही शेतात लाइनमन गेला नाही. पण या सरकारने आल्या आल्या शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य लोकांवर अन्याय करणे सुरू केले आहे. आज शेतकऱ्यांजवळ पैसा नाही, सोयाबीन, कापूस, धान, मिरची पिकांचे नुकसान झाले. बोंडअळीनेही मोठे नुकसान केले. सरकारने सांगितले होते की, एकरी २५ हजार रुपये बांधावर जाऊन देऊ, दिले नाही. पीक विम्याची रक्कम मिळत नाहीये. पिकच आलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांजवळ पैसाच नाही. अशा वेळी त्यांची वीज कापणे म्हणजे येणाऱ्या हंगामावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. सरकारने शेतकऱ्यांवर असा अन्याय करू नये, अशी सरकारला विनंती करत असल्याचे बावनकुळे म्हणाले.

सरकारने कोरोनाच्या संक्रमणामध्ये वीज बिल माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते, ते पाळले नाही. सुरुवातीला १०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्‍वासन दिले होते, ते पाळले नाही. वीज बिल दुरुस्त करून देण्याचेही आश्‍वासन पाळले नाही. आमची मागणी काही वेगळी नाहीच. तुम्ही जे जे जनतेला कबूल केले होते, कमीत कमी तेवढी तरी कामे करा, येवढीच मागणी आहे. ५ ते १० हजार रुपये जरी सरकारने बजेटमधून महावितरण कंपनीला दिले, तर राज्यात एकाचीही वीज कापण्याची वेळ येणार नाही. आमच्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तिन्ही कंपन्यांना विशेष अनुदान देऊन काम चालवले होते. परिणामी त्या ५ वर्षांत आम्ही ४५ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ शकलो. पण या सरकारकडे त्या संवेदना नाहीत. आता आम्ही सरकारच्या या अन्यायाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत, हे आंदोलन इतके तीव्र असेल की सरकारला नामोहरम करून सोडेल, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. 

वीज कापू देऊ नका, संघर्ष करा
वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी वीज कापायला आल्यास त्यांना जोडणी कापू देऊ नका, संघर्ष करा आणि आम्हाला कळवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते येतील आणि तुमच्यासोबत मिळून महावितरणशी संघर्ष करतील आणि एकाचीही वीज कापू देणार नाही. महावितरणने वीज जोडण्या कापण्याचे काम सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांना वीज कापू न देता भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांची माहिती द्या, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे. 

नाना पटोलेंनी घ्यावा पुढाकार
गेल्या १४ महिन्यांमध्ये या सरकारने अनेक निर्णय असे घेतले आहेत की जे लोकहिताच्या विरोधात आहेत. आता जनता जेव्हा या सरकारच्या विरोधात जात आहे, अशा वेळेस केंद्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंधन दरवाढीच्या प्रश्‍नावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना विनंती करतो की, त्यांनी सरकारला सूचना द्यावी, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी आणि पेट्रोल, डिझेलवर राज्य सरकारने जो ३८ रुपये कर लावला आहे, तो कमी करावा. विनाकारण आंदोलनाचे नाटक करू नये आणि केंद्र सरकारकडे बोट दाखवू नये, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख