कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील एकमेव खासदारांनी भाजपच्या ‘या’ आमदारांनाही दिले विजयाचे श्रेय...

खासदार बाळू धानोरकर यांनी माजी आमदार विश्‍वास नांदेकर यांच्याबद्दलही सूचक विधान केले. त्यांच्या भाषणाचे आजही अनेक अर्थ लावण्याचे प्रयत्न राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील एकमेव खासदारांनी भाजपच्या ‘या’ आमदारांनाही दिले विजयाचे श्रेय...
Balu Dhanorkar

नागपूर : वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार MLA of Wani Sanjeevreddy Bodkurwar यांना यापूर्वी फार त्रास होता. सतत चंद्रपूरला ये-जा, बैठकांवर बैठकांना हजेरी लावून ते त्रस्त झाले होते. पण चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघाचा खासदार बदलला आणि आमदार बोदकुरवारांचा त्रासच कमी झाला. तसेही माझ्या विजयात येथे बसलेल्या सर्वांचा वाटा आहे, त्यातही तो सर्वाधिक आमदार बोदकुरवारांचा आहे, असे कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर म्हणाले. The only congress mp from maharashtra Balu Dhanorkar त्यांच्या या वक्तव्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. 

काल रविवारी यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील शेवाळकर परिसरात रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या वणी तालुका ग्रामीण शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, उपाध्यक्ष राजुदास जाधव, उपाध्यक्ष संजय देरकर, वसंतराव घुईखेडकर, कॉंग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार, शिवसेनेचे माजी आमदार विश्‍वास नांदेकर आणि रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास काळे उपस्थित होते. 

यावेळी बोलताना बाळू धानोरकर यांनी चौफेर फटकेबाजी केली. मंचावर उपस्थित सर्व नेत्यांना त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय दिले. हे बोलताना त्यांनी सर्वाधिक उल्लेख केला तो, आमदार बोदकुरवारांचा. ‘चंद्रपूरचा खासदार बदलला हे माझ्यासाठी सर्वाधिक चांगले झाले. माझा सर्व त्रासच कमी होऊन गेला, असे बोदकुरवार मला खासगीत सांगतात’, असा गौप्यस्फोट खासदार धानोरकरांनी करताच मंचावरील मंडळीही काही क्षण बुचकळ्यात पडली आणि बोदकुरवार यांच्याकडे काही वेळ का असेना, संशयाने बघायला लागली. नंतर मात्र हास्याचे कारंजे उडाले. 

त्यानंतर निवडणूक प्रचाराच्या वेळी ‘तुम्ही इकडे वणीत कशाला जास्त फिरता, तिकडे जा, इकडे सर्व ठीक आहे.’, असे आमदार बोदकुरवार यांनी मला सांगितले. त्यावर मी विचारले की तिकडे कुठे? तर ते म्हणाले, ‘शिंदोला परिसराकडे जा, तिकडे लक्ष द्या, इकडे आम्ही आहोत आणि तुम्ही इकडे जास्त फिरले की आम्हालाही प्रश्‍न केले जातात’, असे म्हटल्याचेही खासदारांनी सांगितले. त्यावर ते आमदार बोदकुरवारांना उद्देशून म्हणाले की, आता ‘त्यांची’ काळजी करण्याचे काही कारण नाही, कारण ‘ते’ आता कुठल्याही पदावर नाहीत आणि राहणारही नाहीत. त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. येथे खासदार धानोरकरांनी मोठ्या चतुराईने माजी खासदारांचा नामोल्लेख टाळत आणखी एक गौप्यस्फोट करून आमदार बोदकुरवारांची लोकसभा निवडणुकीतील भूमिकाच आज जाहीरपणे स्पष्ट करून टाकली. पण आमदार बोदकरवारांना माजी खासदारांनी प्रथम निवडून आणले, असे माननारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे.  

हा कार्यक्रम झाल्यानंतर वणी शहरात राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. या कार्यक्रमाला मातब्बर राजकीय मंडळी उपस्थित होती. सर्वपक्षीय नेते मंचावर असल्याचा पुरेपूर फायदा खासदार धानोरकर यांनी उचलला आणि हास्याचे कारंजे उडवीत मिस्कीलपणे टिपण्या करीत चौफेर फटकेबाजी केली. हे करताना भाजपच्या आमदारांना त्यांनी अडचणीत तर टाकले नाही ना, अशीही चर्चा वणी तालुक्यात होते आहे. ‘सध्या देशातील आणि राज्यातील राजकारणाची हवा बदललेली आहे आणि राजकीय हवेच्या विरोधात आम्ही लढलेलो आहे. राज्यात महाविकास आघाडी काम करते आहे. विश्‍वासराव भविष्यातही आम्ही तुम्हाला घेऊन चालू. बाकी नशीब तुमचे...’, असे म्हणत खासदार बाळू धानोरकर यांनी माजी आमदार विश्‍वास नांदेकर यांच्याबद्दलही सूचक विधान केले. त्यांच्या भाषणाचे आजही अनेक अर्थ लावण्याचे प्रयत्न राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.